‘रडा, माझ्या देशवासियांनो’, चिदम्बरम यांची मोदींवर टीका

देशव्यापी टाळेबंदीच्या २१ व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर काँग्रेसने टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणात एकही ठोस उपाययोजना नसल्याचं म्हणत या भाषणाला ‘हवाहवाई’ असं संबोधलं आहे. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधानांच्या भाषणात कोणत्याही आर्थिक पॅकेजचा उच्चारही नव्हता किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत? याबद्दल मोदींच्या संपूर्ण भाषणात एकही वाक्य नव्हतं, असं म्हणत काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी गरिबांना ४० दिवस स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायची आहे, असं म्हणत मोदींवर हल्लाबोल केला. ‘गरिबांना ४० दिवसांसाठी स्वत:च आपली सोय करण्यासाठी सोडलंय. ‘पैसा आहे, धान्य आहे पण सरकार ते देणार नाही… रडा, माझ्या देशवासियांनो’ असं ट्विट पी चिदंबरम यांनी केलंय. रघुराम राजन ते जिन ड्रेझ, प्रभात पटनायक ते अभिजित बॅनर्जी यांनी सुचवलेले अनेक सल्ले कचरापेटीत टाकण्यात आलेत, असंही त्यांनी म्हटलंय.