Fri. Dec 3rd, 2021

…म्हणून मनसेच्या ‘या’ नेत्याच्या घरी ‘सामना’ बंद

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून अनेकांवर शब्दांचे हल्ले केले जाते. या अग्रलेखाची दखल देशातील माध्यमांनाही घ्यावी लागते.

परंतु 25 जानेवारीच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेमुळे मनसेच्या नेत्याच्या घरी आजपासून दै.सामना बंद करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसे नेत्याने ट्विटद्वारे दिली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन सामना वृत्तपत्र बंद करणार असल्याची माहिती दिली आहे.  

काय म्हणाले अमेय खोपकर ?

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांचा ‘रडत राऊत’ असा उल्लेख केला आहे.

सामना वृत्तपत्र आमच्या घरी सुरुवातीपासून येतो. वृत्तपत्रातून पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो. परंतु संजय राऊत जी आगपाखड करत आहेत त्याचा मी निषेध करतो.

आणि या सर्वाचा निषेध म्हणून आजपासून सामना बंद करत असल्याचं अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमधून जाहीर केलं आहे.

नक्की प्रकरण काय ?

गुरुवारी 23 जानेवारीला मनसेचं गोरेगावात अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात मनसेने राजमुद्रा असलेलं नव्या ध्वजाचं अनावरण केलं.

निवडणुकीच्या काळात एक तर इतर वेळेस एक असे दोन ध्वज मनसेचे असणार आहेत.

तसेच या अधिवेशनात मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. या सर्व मुद्द्यांवरुन आजच्या (25 जानेवारी) सामना अग्रलेखातून मनसेवर टीका करण्यात आली. 

‘झेपेल तर करा, दोन झेंड्याची गोष्ट’ या अग्रलेखातून टीका केली गेली. याचा निषेध म्हणून अमेय खोपकर यांनी सामना बंद करण्याचे जाहीर केले आहे.

झेंडे आणि अजेंडे बदलणाऱ्यांनी बोलू नये

ज्यांनी मागील काही महिन्यांमध्ये सत्तेसाठी झेंडे आणि अजेंडे बदलले. त्यांना दुसऱ्यांच्या झेंड्याच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही. आमचा महाराष्ट्र धर्म हा कडवा आहे.

आम्ही तुमच्यासारखी दिल्लीश्वरांपुढे निष्ठा गहाण टाकली नाही, अशा श्ब्दात सेनेवर खोपकरांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

फक्त भसाभसा अग्रलेख खरडल्याने तुम्ही थोर होत नाही, अशी खरमरीत टीका संजय राऊतांवर केली आहे.

महाविकासआघाडीचा अमेय खोपकर यांनी महाखिचडी असा उल्लेख करत खिल्ली उडवली. महाखिचडीची सत्ता हातून गेल्यावर ढसाढसा रडू नका, असंही खोपकर म्हणाले आहेत.

दरम्यान या अग्रलेखावरुन मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे ?

आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात.

काळजी करू नका आम्हीच उपचार करू, असे संदीप देशपांडे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *