Fri. Feb 21st, 2020

अघोरी : मुलीच्या नग्नपूजा आणि नरबळीचा कट उधळला !

जय महाराष्ट्र वेब न्यूज, औरंगाबाद

 

पुरोगामी महाराष्ट्रात आजही गुप्तधनासारख्या गोष्टीवर विश्वास ठेवून नरबळीसारख्या अघोरी प्रथा केल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये नुकताच असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या रांजणगावमध्ये गुप्तधनासाठी 24 ऑगस्ट रोजी रात्री मुलीची नग्नपूजा आणि नरबळीचा एक धक्कादायक प्रकार घडणार होता. सुदैवाने गुप्तधनासाठी रचलेला हा कट अंनिस आणि पोलिसांनी वेळीच उधळून लावला.

 

काय होता हा अघोरी प्रकार?

औरंगाबादमध्ये बाळू गणपत शिंदे (बेथेलवाडी ता. जालना) नावाच्या व्यक्तीने गुप्तधन शोधून देतो असं आश्वासन देत दिगंबर कडूबा जाधव ( रांजणगाव ता. फुलंब्री) यांच्याकडून 1 लाख 68 हजार रुपये घेतले. त्यानंतर गुप्तधन शोधण्यासाठीपूजाही करण्यात येणार होती. या पूजेकरिता एक हंडा, जादूटोण्याच्या काड्या, एक मूर्ती, लाल कापड आदी सामुग्री आणण्यात आली. ही पूजा शेतामध्ये करण्यात येणार होती. या पुजेसाठी सर्व कुटुंबीय एकत्र जमले.

या अघोरी प्रकारासाठी बाळू शिंदे आणि इमामखान पठाण या दोघांनी एक ओमनी गाडीही भाड्याने घेतली होती.

एवढंच नव्हे, तर नग्नपुजेसाठी एक मुलगीही आणण्यात येणार होती.

मात्र, या सर्व प्रकराची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शहाजी भोसले यांना मिळाली. त्यांनी तातडीने फुलंब्री पोलीस ठाणे गाठले.

यानंतर शहाजी भोसले आपल्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन रांजणगावात पोहचले. येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

तेथील सर्व साहित्य जप्त करण्यात आले. 

हा अघोरी प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीचा जीव वाचला आहे.

मात्र ती मुलगी कोण होती, कुठे आहे हे अद्याप आरोपी सांगायला तयार नाहीत. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *