देशात कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू

देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यामुळे प्रत्येक राज्याने टाळेबंदी शिथिल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी टाळेबंदी उठवली आहे. मात्र कोरोनाच्या डेल्टा विषाणूने आपलं रुप पुन्हा बदललं आहे. टाळेबंदी शिथिल होत असतानाच विषाणूने आपले रुप बदलल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
म्युटेशनद्वारे तयार झालेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटने अधिक रौद्र रूप धारण केलं असून, त्याला ‘डेल्टा प्लस’ असं संबोधलं जात आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेकडून डेल्टा व्हॅरिएंटमधल्या बदलांचा नियमितपणे आढावा घेतला जातो. त्यादरम्यान डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. भारतात सात जूनपर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेले सहा रुग्ण आढळल्याचंही त्या संस्थेने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
कोरोनावर आपत्कालीन उपचारांकरिता मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल थेरपीला भारतात अलीकडेच मंजुरी देण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपीय महासंघात आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारे भारतातही सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स ट्रोल ऑर्गनायझेशनने या थेरपीच्या वापराला मे महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली होती; मात्र K417N हे म्युटेशन असलेला डेल्टा प्लस व्हेरियंट अँटीबॉडीज कॉकटेलला दाद देत नाही, असं आढळलं आहे. भारतात K417N या म्युटेशनचा प्रादुर्भाव अजूनतरी मोठ्या प्रमाणात नाही, ही दिलासादायक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.