Sun. May 9th, 2021

तत्वज्ञ नाटककार!

90 च्या दशकात वाढलेल्यांना गिरीश कर्नाड यांची पहिली ओळख दूरदर्शनवरील ‘मालगुडी डेज’ मालिकेतील ‘स्वामी’चे वडील म्हणून झाली असेल. त्यानंतर काही कलात्मक हिंदी, कन्नड, तामिळ सिनेमांमधूनही ते अधून मधून दिसत. माझ्यासाठी त्यांची ओळख ही तेवढीच होती. रविवारी दुपारी टीव्हीवर लागणाऱ्या प्रादेशिक सिनेमांमध्ये ते अधून मधून दिसायचे. मात्र ‘एक था टायगर’ किंवा ‘टायगर जिंदा है’ सारख्या सिनेमांतून सलमान खानचे बॉस या व्यक्तिरेखेच्या खूप पलिकडे त्यांचं कलाक्षेत्रात स्थान आहे. त्यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी, कन्नड साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, कालिदास सन्मान या पुरस्कारांनीही कर्नाड यांना गौरवण्यात आलंय. ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं.  गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त विधानं, सरकार विरोधी वक्तव्य यांसारख्या गोष्टींमुळे चर्चेत असणारे कर्नाड नाट्यकलेतील स्वतंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या तीन दिग्गज नाटककारांपैकी एक आहेत.

स्वतंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाचे नाटककार

1947 सालानंतर नाट्यक्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे तीन विविध भाषांतले नाटककार महत्त्वाचे मानले जातात.

  1. विजय तेंडुलकर (मराठी रंगभूमी)
  2. बादल सरकार (बंगाली रंगभूमी)
  3. गिरीश कर्नाड (कन्नड रंगभूमी)

तेंडुलकरांनी मराठी रंगभूमीवर मध्यमवर्गीय जाणिवांमधील सेक्स आणि हिंसेच्या भावनांना प्रकट केलं. त्यामुळे त्यांची नाटकं एकूणच झंझावाती ठरली. त्याचवेळी  गिरीश कर्नाड हे समकालीन परिस्थितीला पारंपरिक रंगभूमीशी जोडून त्याला वेगळं स्वरूप देत होते. महाभारत, पुराणकथा, लोककथा यांच्यामार्फत आधुनिक घडमोडींना लोकांसमोर सादर करण्याची वेगळी शैली त्यांनी प्रेक्षकांपुढे सादर केली. कर्नाड हे मुळात कोंकणी भाषक होते. मात्र त्यांचे डॉक्टर वडील आणि आई पुण्यात काम करत असल्याने बालगंधर्व आणि तत्सम मराठी रंगभूमीने बारावून गेले होते. महाराष्ट्रातल्याच माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. पुढे धारवाड येथे हे कुटुंब राहायला गेलं. त्यावेळीही मराठी आणि कन्नड भाषा तेथे मोठ्या प्रमाणावर बोलल्या जात. मात्र पुण्याहून थेट धारवाड तसंच तेथील शिरसी या छोट्याशा गावात त्यांच्या आईला मात्र अजिबात राहवत नव्हतं. शिरसीमध्ये गिरीश कर्नाड चौदा वर्षांचे होईपर्यंत वीजही आली नव्हती. धारवाडमध्ये अनेक मराठी नाटक कंपन्या दौरे करत. तेव्हा मराठी नाटकं पाहायला गिरीश कर्नाड यांना मिळत होती. जेव्हा ही नाटकं येत नसत, तेव्हा कन्नड संस्था मराठी नाटक भाषांतरीत करून आपल्या पद्धतीने सादर करत. नाटकांच्या या प्रारंभिक जाणीवा त्यांना मराठी रंगभूमीतून मिळत होत्या. गावात वीजच नसल्याने संध्याकाळी अंधारात गोष्टी सांगणं, ऐकणं हाच विरंगुळा असे. दक्षिण भारतातील पारंपरिक नाट्यकला ‘यक्षगान’ त्यांना शिरसीत अनेकवेळा त्यांना पाहायला मिळत असे.

 

व्हायचं होतं इंग्लिश कवी, पण झाले कन्नड नाटककार!

इंग्लंडच्या जोखडातून नुकत्याच मुक्त झालेल्या स्वतंत्र भारतातील पहिल्या तरूण पिढीतील ते होते.

लहानपणापासून वर्डस्वर्थ, इलियट यांसारख्या कवींप्रमाणे इंग्रजी कवी होणं हे कर्नाड यांचं स्वप्न होतं.

त्यासाठी ते काव्यलेखनाचा शास्त्रशुद्ध अभ्यासही करत होते. इंग्लंडमध्येच जाऊन स्थायिक होण्याची त्यांची इच्छा होती.

‘ऑक्सफर्ड’सारख्या जागतिक स्तरावरील अत्यंत मानाच्या विद्यापीठाची त्यांना scholarship मिळाली होती.

गणित आणि संख्याशास्त्र (Maths and stats) या सारख्या किचकट विषयात BA करण्यासाठी ते ऑक्सफर्डला रवाना होणार होते.

एका लहान गावातून थेट ऑक्सफर्डला जाणं म्हणजे मोठीच अचिव्हमेंट होती.

मात्र कुटुंबियांना मात्र आपल्या मुलाचं कसं होणार, ही चिंता वाटू लागली. इंग्लंडला गेल्यावर तिथल्याच कोणत्यातरी ‘गोऱ्या मेम’च्या जाळ्यात अडकून ते कायमचे तिकडचे होऊन गेले तर? अशी टिपीकल भीती सगळ्यांना सतावू लागली. गिरीश कर्नाड स्वतः मात्र या सगळ्याबद्दल तयार होते. उलट त्यांना आई-वडिलांची चिंता आणि पुन्हा आपल्या गावात परतण्यासाठी आधीपासूनच होणारी भावनिक जबरदस्ती त्रासदायक होऊ लागली.

जेव्हा एखाद्या कलाकाराला अस्वस्थ वाटू लागलतं, तेव्हा त्याचा उद्गार ज्या साहित्यप्रकारातून व्यक्त होतो, तिच त्याची खरी  शैली असते.

कवीच्या भावना दुखावल्या, की तो काव्य लिहितो.

लेखकाला आपलं मत मांडायला एखादा लेख किंवा पुस्तक किंवा कथेचा आधार घ्यावा लागतो.

मात्र इंग्लिश ‘सॉनेट्स’ लिहिण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या कर्नाड यांना मात्र कुटुंबियांच्या भावनिक ओझ्याने वाटणारी अस्वस्थता इंग्रजी काव्यातून नव्हे, तर थेट कन्नड नाटकातून व्यक्त झाली.

वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी हे पहिलं नाटक लिहिलं आणि आपण इंग्लिश कवी नव्हे, तर कन्नड नाटककार आहोत, याचा साक्षात्कार त्यांना झाला. ते अक्षरशः रडू लागले.

पण ते नाटक भारतीय रंगभूमीला कलाटणी देणारं नाटक ठरलं. ते नाटक होतं ‘ययाती’!

 

ययाती आणि तुघलक

महाभारतातील ययातीची कथा सर्वांनाच परिचित होती.

कादंबरीकार वि.स. खांडेकर यांची ययाती ही मराठी कादंबरी प्रचंड गाजली. त्यासाठी त्यांना ज्ञानपीठही मिळालं.

वासनेच्या आहारी गेलेल्या ययाती राजाला वृद्धत्वाचा शाप दिला जातो. जर तुझ्या एखाद्या पुत्राने तुझं म्हातारपण स्वीकारलं, तर तू तरूण राहशील असा उःशापही त्याला गयावया केल्यावर मिळतो.

ययातीचा पुत्र पुरू वडिलांसाठी स्वतःच्या तारुण्याचा त्याग करत आणि वडिलांचं म्हातारपण स्वीकारतो.

ययाती तरुण राहून हजार वर्ष आपलं जीवन उपभोगतो. मात्र तारुण्याची हाव कधीच न संपणारी आहे, याची जाणीव झाल्यावर आणि मुलाच्या बलिदानाचा त्याला पश्तात्ताप होऊन तो पुरूला त्याचं तारूण्य परत करतो, अशी ही पुराणकथा आहे.

लहानपणापासूनच रामायण, महाभारत, पुराणकथा यांच्यावरच वाढलेल्या कर्नाड यांनी ययातीवरील नाटक लिहिलं. संस्कृत नाटकाप्रमाणे या नाटकाची रचना असली, तरी शैली मात्र ग्रीक नाटकासारखी होती.

विशेष म्हणजे त्यातील पात्र पौराणिक न वाटता आजच्या काळातील वाटत होती. आजही भारतीय समाजात अनेकवेळा वडील आपली अपूर्ण स्वप्नं मुलांवर लादून त्यांच्या इच्छांचा विचार न करता आपली जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकतात.

कर्नाडांचं ययाती हे नाटक त्याच वडील मुलांमधील संघर्ष अधोरेखित करत होता. त्यात इंग्लंडवरून परतण्याची कुटुंबियांकडून होणाऱ्या जबरदस्तीची पार्श्वभूमी होतीच.

वयाच्या 23व्या वर्षी लिहिलेलं हे नाटक भारतीय रंगभूमीवरील महत्त्वाचं नाटक ठरलं.

त्याहून मोठं नाटक ठरलं, ते त्यांनी 25 व्या वर्षी लिहिलेलं ‘तुघलक’.

इंग्लंडमध्ये शिकत असताना भारतातील ऐतिहासिक व्यक्तींसंदर्भात नाटक लिहिण्यासाठी ते प्रवृत्त झाले.

भारतीय इतिहास त्यांनी चाळून पाहिला आणि त्यातील बदनाम आणि वेडा ठरवला गेलेला दिल्लीचा सुलतान ‘महंमद तुघलक’ एका विवक्षित क्षणी त्यांना भावला, आणि त्यांनी ‘तुघलक’ हे नाटक लिहिलं.

तुघलक नाटकाचे आज जगभरात प्रयोग होतात.

भारतीय रंगभूमीवरील ते अत्यंत महत्त्वाचं नाटक मानलं जातं.

कन्नड भाषेतील हे नाटक देशातल्या जवळपास सर्व भाषांत सादर झालंय.

याचं मराठी भाषांतर विजय तेंडुलकरांनी केलं होतं. अरूण सरनाईक या मराठीतील प्रख्यात अभिनेत्याने तुघलक साकारला आणि दामू केंकरे यांनी नाटकासाठी केलेलं पायऱ्या पायऱ्यांचं नेपथ्य ऐतिहासिक ठरलं.

इंग्रजीत आलेक पद्मसीने हे नाटक सादर करताना त्याची केलेली सुरूवात भयंकर गाजली.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झालेला अभिनेता कबिर बेदी याने या नाटकात तुघलक साकारला.

नाटकाच्या सुरुवातीला कबीर बेदी नग्नावस्थेत प्रेक्षकांमधून रंगमंचाकडे जात असे. वाटेत त्याला विविध सेवक येऊन मोजड्या, पोषाख इत्यादी गोष्टी परिधान करत. मंचावर असणाऱ्या सिंहासनावर पोहोचेपर्यंत त्याच्या डोक्यावर सुलतानाची पगडी ठेवली गेली असे. त्यामुळे जेव्हा तो प्रेक्षकांना सामोरा जात असे, तेव्हा तो जंगली आणि निष्पाप आदिम भावना असणाऱ्या मानवाचा हुकुमशाहात झालेला बदल दर्शवत असे.

 

हे नाटक गाजण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे ‘आदर्श भारत’ या संकल्पनेची होत असलेली पडझड हे होतं.

स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांची देशाबद्दल अनेक स्वप्नं होती. लोकांना नेहरूंबद्दल प्रचंड प्रेम आणि तितक्याच अपेक्षा होत्या. सर्वधर्मसमभावाची त्यांनी दिलेली साद आणि समाजवादाची बांधणी भारतीय समाजाने मान्य केली होती.

मात्र आता त्या अपेक्षांना तडे जाऊ लागले होते. बेरोजगारी वाढली होती. नेहरूंच्या स्वप्नातला भारत साकारला जात नव्हता. अनेक चुका घडल्या होत्या. भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर अपेक्षाभंग होत होता. नेहरूंचे अनेक निर्णय तरुणांना पटत नव्हते. बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा होता. नेहरूंची भव्य स्वप्न आणि आदर्श भारत यांचं समीकरण कुठेतरी हरवलं होतं. ‘तुघलक’ नाटकात याच सामाजिक जाणिवेचं प्रतिबिब दिसलं आणि नाटक गाजलं.

हयवदन, नागमंडल आणि इतर नाटकं…

कर्नाड यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांवर संस्कृत नाटकांचा प्रभाव होता. पण विषय समकालीन होते.

‘हयवदन’ या नाटकात कथासरित्सागरमधील विक्रम वेताळातल्या कथेचा आधार होता.

बुद्धिमान पंडिताशी विवाह झालेली पत्नी त्याच्या पहिलवान मित्राच्या प्रेमात पडलेली असते. मात्र चमत्कृतीपूर्ण घटनांमध्ये पंडित देवदत्तचं शीर पहिलवान कपिलच्या धडावर जातं आणि कपिलचं शीर देवदत्तच्या धडावर… अशावेळी तिचा खरा पती कोण, असा प्रश्न निर्माण होतो.

नागमंडल नाटकात पतीच्या रूपात अवतरलेल्या नागाशी संसार करणाऱ्या नायिकेची लोककथेतील कहाणी त्यांनी नाटकातून सादर केली.

‘अग्नी मट्टू मळे’, ‘तलेदंड’, ‘हित्तिन हुंज’, ‘फ्लॉवर्स’ इत्यादी नाटकांमधून संस्कृत नाटकांच्या शैलीत लोककथा, एतिहासिक घटना यांची सांगड प्रचलित घटनांशी त्यांनी लावली.

‘तलेदंड’ या 12व्या शतकातील बसवेश्वर यांच्या जीवनावरील नाटकाचा संदर्भ तत्कालीन मंडल आयोग आणि बाबरी मशीद पतन या घटनांत होता.

‘टिप्पुविन कनसुगळू’ या BBC साठी लिहिलेल्या नाटकात टिपू सुलतानाने लिहून ठेवलेल्या स्वप्नांचा संदर्भ होता.

गेल्या काही काळात त्यांनी मॉडर्न शैलीत नाटकं लिहिणं सुरू केलं होतं. बंगळुरू शहराची बदलती सामाजिक अभिरूची, मॉडर्न फॅमिली यांसारखे विषय त्यांच्या नाटकात डोकावू लागले.

‘ओदकलु बिंब’ या नाटकात तर अक अभिनेत्री आणि तिची पडद्यावर दिसणारी प्रतिमा यांचा आपसातला संवाद सादर करून आधुनिक पद्धतीच्या रंगभूमीलाही त्यांनी आश्चर्यचकित केलं.

खेळता खेळता आयुष्य!

सिनेमाविश्वलात त्यांनी केलेलं कामही खूप गाजलं. अनेक कन्नड कादंबऱ्यांचं त्यांनी सिनेमात रूपांतर केलं. नसिरुद्दिन शाहसारख्या अभिनेत्याला सिनेमात काम करायची संधी देणारे गिरीश कर्नाडच. त्यांनी सरकारविरोधात केलेली विधानं, त्यांची अनेक बेधडक वक्तव्यं यांमुळे त्यांना अनेकदा ठार मारायच्याही धमक्या येत होत्या. मात्र या सर्वांना भीक न घालता ते आपली मतं कोणतीही भीडभाड न बाळगता मांडत राहिले. प्रसिद्ध कलाकार अमरीश पुरी कायम त्यांना ‘तत्वज्ञ नाटककार’ करत. रंगभूमीची दैदिप्यमान परंपरा आणखी उजळवणारे आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रेम असणारे ‘तत्वज्ञ नाटककार’ गिरीश कर्नाडही आता या जगात नाही. आपल्या आत्मचरित्राचं नाव त्यांनी ‘खेळता खेळता आयुष्य’ असं ठेवलं होतं. अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या विचारांसाठी लढत राहणारे गिरीश कर्नाड यांनी आपलं आयुष्य खरंच विविध जाणीवांशी खेळत साजरं केलं आणि मृत्यूही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *