Fri. Jul 30th, 2021

‘सर्परूपात सोमनाथ!’ श्रावणात भाविकांची फसवणूक…

जय महाराष्ट्र वेब न्यूज, पुणे

 

बारामतीमध्ये सोमेश्वरला भाविकांच्या श्रद्धेची होणारी फसवणूक उघड झाली आहे. सोमेश्वरला श्रावणात सर्पस्वरुपात साक्षात सोमनाथ प्रकटतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांच्या याच श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार येथे घडत आहे.

सर्पस्वरुपात सोमनाथ प्रकट झाल्याचं दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. दूध पाजून या सापांच्या जीवाशी खेळ होत असताना आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. 

बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोमेश्वर देवस्थान मंदिरात श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र या ठिकाणी आलेल्या भाविकांकडून पैसे घेऊन सर्परुपी सोमेश्वराचे दर्शन दिले जात असल्याच्या चर्चा आजवर अनेकदा रंगल्या. वन्यजीव संरक्षण कायदा, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत यावर कारवाई व्हावी अशीही मागणी आजवर अनेकदा करण्यात आली.

कशी केली जात आहे भाविकांची फसवणूक?

  • या ठिकाणी अचानक सर्परूपात सोमेश्वर प्रकट होतो असे सांगितले जाते.
  • त्यानंतर त्या सर्पाला मंदिराच्या बाजूला मांडवात एका भांड्यात ठेवले जाते 
  • त्याच्या बाजूला दुसऱ्या भांड्यात पैसे गोळा केले जातात. 

भोळेभाबडे भक्त या सर्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने रांगा लावत आहेत. कोणताही साप हाताळणे, त्याला बऱ्याच काळ आपल्या ताब्यात ठेवणे हे पशुपक्षी संरक्षण कायद्यात बसत नाही. या पुजाऱ्याकडे हा साप आला कुठून असा ही प्रश्न आता उपस्थित होतोय.

गुजरात सौराष्ट्र सीमेवरील सोरटी सोमनाथचे हे प्रतिरूप मानले जाते. ‘सतीचं वाण’ हा प्रसिद्ध मराठी चित्रपट सोमेश्वर येथील  कथेवर बेतला आहे. सोमेश्वर मंदिरात तीर्थाची बारव खऱ्या-खोट्या शपथांसाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक युगाच्या काळातही सोमेश्वर मंदिराच्या बारवेत कोरलेल्या नागराजासमोर बसून खरे खोटे करण्यासाठी राज्यभरातून लोक येत असत.

हा सगळा अंधश्रद्धेचा बाजार खुलेआम चालू आहे. तिथे येणाऱ्या भाविकांना सर्पाचे दर्शन करून पैशे उकळण्याचा गोरखधंदा या ठिकाणी चालू आहे. तरी यावर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात देवाच्या नावाखाली बारामतीत असा प्रकार चालू असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे आतातरी यांच्यावर कारवाई होणार का असाच प्रश्न उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *