Sun. Apr 18th, 2021

किल्ल्यावर ‘नको ते’ उद्योग करणाऱ्या मुलांना शिवप्रेमींचा दणका

नववर्षाचं स्वागत करताना मद्यपान करण्याकडे अनेकांचा कल असतो. विविध पब्ज, बार्स एवढंच नव्हे तर बीचेसवरही सगळीकडे तळीरामांची गर्दी 31 जानेवारीला पाहायला मिळते. मात्र काही अतिउत्साही लोक थेट किल्ल्यांवर जाऊन मद्यपान करतात. असाच प्रकार घडला तो पेबच्या किल्ल्यावर…

शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी अनेक लढाया लढून, प्राणांची बाजी लावून स्वराज्य मिळवलं. या स्वराज्याचे खरे पहारेकरी आणि साक्षीदार म्हणजे महाराष्ट्रातील गडकिल्ले. ज्या किल्ल्यांसाठी आपल्या पूर्वजांनी प्राण वेचले त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व मंदिरांपेक्षा कमी नाही. मात्र याची किंमत नसलेले अनेकजण किल्ल्यांवर जाऊन अपेयपान करतात. पेबच्या किल्ल्यावर अनेक तरुण मुलं दारूच्या बाटल्या घेऊन 31st ची पार्टी करायला जमा झाली. एवढंच नव्हे, तर सोबत गांजादेखील त्यांनी आणला होता.

दारू आणि गांजाच्या नशेत धुंद करणाऱ्या पार्टीबद्दल जवळील शिवप्रेमींना माहिती मिळाली. त्यावर ते तात्काळ पार्टीच्या जागी पोहोचले आणि त्यांनी गांजासारखे मादक पदार्थ घेऊन धुंद झालेल्या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. नशा करणाऱ्या तरुणांना शिवप्रेमींनी दणका दिल्यावर ते वठणीवर आले. त्यांना शिवप्रेमींनी ‘शिवाजी महाराज की जय’ या घोषणा द्यायला लावल्या. मात्र त्यांना शिक्षा केल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन न करता सोडून दिलं.