Mon. Oct 26th, 2020

इच्छापूर्तीसाठी ‘इथे’ मंदिरात कुलुपं लावली जातात, आणि…

देशात विविध मंदिरांमध्ये विविध परंपरा पाळल्या जातात. कानपूरमध्ये एका मंदिरात कुलुपं लावायची प्रथा आहे. कानपूरच्या बंगाली टोला भागातील कालीमाता मंदिरात ही अजब प्रथा आहे. आपल्या नशिबाला लागलेलं टाळं उघडावं म्हणून कालीमातेला कुलुपं अर्पण करायची प्रथा आहे.

खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. काम करूनही प्रगती होत नाही, एखाद्या कामात अडथळे येत आहेत, मार्गात अनेक विघ्नं येतात. कधी लग्नाची बोलणी पुढेच सरकत नाहीत, कधी नोकरीमध्ये पदोन्नतीच होत नाही. थोडक्यात नशिबालाच कुलूप लागलंय, असं अनेकांना वाटत असतं. असेच दुर्दैवी भाविक या मंदिरात कुलुपं अर्पण करतात.

हे मंदिर 300 वर्षं जुनं असल्याचं सांगण्यात येतं. प्रथेनुसार भाविक लोक देवीकडे आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवस बोलायला येतात. मंदिरात येऊन कुलुपांची प्रथम पूजा करतात. आपली इच्छा सांगून त्यानंतर कुलुप लावून टाकतात. त्याची चावी मात्र सोबत घेऊन जातात. इच्छापूर्ती झाली की पुन्हा मंदिरात येऊन कुलूप उघडतात. नवरात्रीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

काय आहे या मागची कथा?

शेकडो वर्षांपूर्वी एका महिलेच्या स्वप्नात मातेने दर्शन दिलं आणि मंदिराच्या प्रांगणात कुलुप लावायला सांगितलं. देवीची भक्त असणाऱ्या महिलेने दुसऱ्या दिवशी या मंदिरात कुलूप लावलं. काही दिवसांनी तिला भिंतीवर तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, असा संदेश दिसला. तिची च्छा खरंच पूर्ण झाल्यावर तिने कुलूप उघडलं. त्यानंतर इथे प्रथाच पडली. लोक हजारोंच्या संख्येने येथे येऊन कुलुपं वाहतात. त्यामुळे या कालीमातेला ‘तालेवाली माता’ असंच नवा पडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *