बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षावर कारवाईची कुऱ्हाड

बीड जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी बी एस देशमुख यांनादेखील तत्काळ सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्जमाफी मधील प्रोत्साहनाची रक्कम बचत खात्यात जमा करण्याऐवजी कर्ज खात्यात जमा करून अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर विभागीय सह निबंधक यांनी ठेवला होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवरील कारवाई हा पंकजा मुंडे यांना दिलेला धक्का असल्याचं मानण्यात येतंय.
काय आहे प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत कारवाईचे आदेश बँकेच्या अध्यक्ष व मुख्यधिकाऱ्यांवर ठेवण्यात आले आहेत.
बचत खात्याऐवजी कर्ज खात्यात रक्कम वर्ग करणं बँकेला महागात पडलं आहे.
या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट यांनी तक्रार केली होती.
त्यानुसार सहकार कायदा 1960 यामधील कलम 79 व इतर पोटकलमान्वये संबंधित अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामुळे खरा न्याय मिळाला असे कालिदास अपेट यांनी म्हटलं.
अफरातफर झालीच नाही?
डबघाईला आलेली बँक सुस्थितीत आणताना बँकेने हा निर्णय घेतला होता, असं कारवाई झालेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी म्हटलं आहे.
या बाबतीत कुठल्याही खातेदाराची तक्रार नाही. कर्जमाफी मधील संपूर्ण रक्कम लाभार्थींना देण्यात आली.
उलट प्रोत्साहनासाठी मिळाल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार कर्ज देऊ शकलो, असं सारडा यांनी सांगितलं. तसेच या बाबतीत कायदेशीर पद्धतीने जाणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.