कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा ; डाँक्टरांच आवाहन

मुंबई – मधुमेही रूग्णांना कोरोना संसर्गाचा धोका हा सर्वांधिक असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे रूग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता ज्या रूग्णांना मधुमेह नाही, अशा रूग्णांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. म्हणून कोरोनातून बरे झाल्यानंतरही आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव Sars Cov-2 असे आहे. शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. कोविड-१९ हा तीव्र श्वसन विकाराशी संबंधित गंभीर आजार आहे. वेळीच निदान व उपचार न झाल्यास रूग्णाचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खोकला, सर्दी, श्वास घेता न येणं, ताप, अंगदुखी, थकवा जाणवणं आणि तोंडाला चव नसणं यांसारखी लक्षणे दिसून येतात. याशिवाय मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता अधिक असते. इतकचं नाहीतर कोरोनातून बरे झाल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतो. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील इंटरनल मेडिकल एक्सपर्ट आणि संचालक डॉ. बेहरम पारडीवाला म्हणाले की, ‘‘मधुमेह नसलेल्या व्यक्तींमध्येही कोरोनातून बरे झाल्यानंतर उच्च रक्तातील साखरेची पातळी निर्माण होऊ शकते. याच मुख्य कारण, कोरोना व्हायरसच्या भितीमुळे लोकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढला आहे. या वाढत्या तणावामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होत आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास अवयव निकामी होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे वाढत्या रक्तातील साखरेची पातळीकडे दुर्लक्ष करू नका. कोरोनातून पूर्णपणे ठिक झाल्यानंतरही रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत आवश्यक तो बदल करा.’’ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावेत…
• रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होईल अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
• दररोज किमान अर्धा-एक तास व्यायाम करा. धावणे, पोहणे आणि सायकल चालविणे यांसारख्या शारीरिक क्रिया करणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.
• धान्य, शेंगदाणे आणि डाळी यांचा जेवणात समावेश करा. याशिवाय नियमित ताजी फळे आणि भाज्या खाव्यात.
• हायड्रेटेड राहण्यासाठी आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
• प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. जेवणात अधिक मिठाचा समावेश करू नयेत. दारूचे सेवन करणं टाळावेत.
• तणावामुळे सुद्धा बऱ्याचदा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे योगाभ्यास आणि ध्यान करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
• डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वेळोवेळी तपासणी करून घ्या. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांचे सेवन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नका, यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
• रात्रीच्या वेळी किमान आठ तास झोप घेणे गरजेचं आहे. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.