‘देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही’

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते.
हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी दाखवून दिल्या. त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपणा कोरोनाचा कहर वाढण्याचं मुख्य कारण असल्याचं अधोरेखित केलं. हर्षवर्धन यांनी यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली.
“गेल्या दोन महिन्यात देशातील करोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. अॅक्टिव्ह रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के आहे,” अशी माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली. “आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे, एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटतं सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेलं धोरण आपण नीट राबवलं तर संख्या कमी होईल,” असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्व गोष्टी पुन्हा सुरु झाल्या असून लोकांचं निष्काळजी वागणं मोठी चिंतेची बाब असल्याचं यावेळी ते म्हणाले.