Wed. Aug 10th, 2022

राज्य सरकारविरोधात रंगकर्मीचे आज आंदोलन

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक विवंचनेत असलेले रंगकर्मी आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्यभर एकाच वेळी आंदोलन करत आहेत. या राज्यव्यापी आंदोलनात केवळ नाटय़कर्मीच नव्हे तर लोककलावंत, तमाशा कलावंत, गायक, वादक आणि पडद्यामागचे हजारो कलाकार सहभागी झाले आहेत.

एकाच वेळी सर्व जिल्ह्य़ांमध्ये हे आंदोलन करण्यात येईल, असे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले. रंगकर्मीच्या मागण्यांचे पत्र अनेकदा मुख्यमंत्र्यांना देऊनही या क्षेत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप रंगकर्मी करीत आहेत. क्रांतिदिनानिमित्त हिंदमाता येथील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर ‘जागर रंगकर्मीचा’ हा कार्यक्रम सादर करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

कोरोना टाळेबंदीमुळे गेले दीड वर्ष काम बंद असल्याने आणि कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने रंगकर्मीना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या या स्थितीकडे सरकारचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले, परंतु सरकारने दखल घेतली नसल्याचा आरोप रंगकर्मीनी केला आहे.

रंगभूमीवर नाटकांचे खेळ सशर्त सुरू करावेत, एकपात्री किंवा दोन-तीन कलाकारांच्या कलाकृतींना, मोकळ्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी द्यावी, घरभाडे आणि वीज देयकांमध्ये सवलत द्यावी, कलाकार-तंत्रज्ञांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, रंगकर्मीसाठी ‘रंगकर्मी रोजगार हमी योजना’ सुरू करावी, करोनास्थिती निवळेपर्यंत रंगकर्मीना दरमहा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात येत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.