Mon. Dec 6th, 2021

जम्मूच्या लष्करी छावण्यांजवळ आढळले ड्रोन

जम्मूमध्ये बुधवारी सलग चौथ्या दिवशी सुरक्षा कर्मचार्‍यांना दोन ड्रोन आढळून आले आहेत. बुधवारी पहाटे जम्मूच्या मीरान साहिब, कालुचक आणि कुंजवानी भागात ड्रोन फिरताना दिसले. पहाटे ४.४० वाजता ड्रोन कालुचक परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. पहाटे ४.५२ वाजता जम्मूच्या कुंजवानी भागात हवाई दलाच्या स्टेशन सिग्नलजवळ आणखी एक आढळून आल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले.

जम्मूमधील लष्करी छावण्यांजवळ हे ड्रोन आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांत जम्मूमध्ये सैन्याच्या छावण्या असलेल्या परिसरामध्ये कमीतकमी सात ड्रोन आढळून आले आहेत.

रविवारी जम्मूतील हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यासमवेत तातडीची बैठक घेतली होती. देशाच्या सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्याचा आणि भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी त्वरेने व्यापक धोरण तयार करण्यावर या बैठकीत चर्चा झाली, असे बैठकीतील घडामोडींची माहिती असलेल्यांनी येथे सांगितले. नव्याने उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी सरकार लवकरच एक धोरण आखणार आहे, विविध मंत्रालये आणि खात्यांमार्फत हे धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि तीनही दले महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आता ड्रोनमार्फत हल्ले होत असल्याने या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यात ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा आणि त्यासाठी लागणारी सामग्री खरेदी करावी, असे तीनही दलांना सांगण्यात आले आहे. मानवरहित हवाई साधनांद्वारे होणारे हल्ले थोपविण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा संपादित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही तीनही दलांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *