Fri. Jan 22nd, 2021

‘आधार’च्या घोळाने अडवली कर्जमाफीची वाट

एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या. यापैकी पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ मिळायला देखील सुरुवात झालीय. पहिल्या यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जुळत नाही. यामुळे त्यांचे आधार क्रमांक दुरुस्त करण्यात आले. पण, हा सुधारित आधार क्रमांक शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्याने आधारच्या या घोळामुळे काही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून सध्यातरी वंचित झाले आहे. एवढंच नव्हे तर जाहीर झालेल्या पहिल्या यादीत चार मृत शेतकाऱ्यांचाही समावेश आहे.

पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांचे बँकेच्या केवायसीमध्ये आधार क्रमांक वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असल्याचे आधार प्रमाणिकरणा दरम्यान समोर आले आहे. या शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या आधार कार्डामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्त आधार क्रमांक कोण अपलोड करेल, याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा निबंधक गौतम वालदे यांनी दिलीय. जिल्ह्यात पहिल्या यादीत या प्रकाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या आठ आहे. ही संख्या सध्या कमी दिसत असली तरी राज्याचा विचार केल्यास हा आकडा मोठा होईल.

जाहीर झालेल्या पहिल्या यादीत जिल्ह्याच्या दोन गावातील १६६ शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी चार शेतकरी मृत असल्याच समोर आलंय. लोणी येथील शेतकरी कवडू सपाट यांचं 14 ऑक्टोबर 2018 ला आजाराने निधन झालं. यावेळेस त्यांच्यावर नाचणगाव बँक ऑफ इंडियाच एक लाखांच कर्ज होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा गणेशने परिवाराचा गाडा उचलत शेती केली. मात्र उत्पन्न न झाल्याने वडिलांवर असलेले कृषी कर्ज थकीत राहिलं. याचं  दरम्यान शेतातील कपासी पिकावर बोंड अळीने हल्ला करत पीक उद्वस्त केलं. सरकारकडून मदतही करण्यात आलीय. याचबरोबर पंतप्रधानांच्या किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत बँकेत पैसे जमा झाले. मात्र बँकेची मिळालेली मदत 15998 रुपये कृषी कर्जात वळती केली. अनेक तक्रारी केल्या मात्र हाती निराशाच लागली.

राज्यात नवीन सरकार आले आणि दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केलीय.यात कवडू सपाट यांचे लाभार्थ्यांच्या यादीत नावही आलं. मात्र योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे, याकरिता कवडू सपाट यांचा अंगठा आवश्यक आहे. कवडू सपाट यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा वारसदार चढवायला प्रशासनाने सांगितलंय. पण वारसाने चढवूनही लाभ अद्याप मिळाला नाहीय.

अशीच काहीशी परिस्थिती लोणी येथील मृत शेतकरी भगवान पिंपळकर यांच्या परिवाराची आहे. यासह आधारचा घोळही शेतकऱ्याच्या जिव्हारी लागला आहे. लोणी येथील रवींद्र कासार यांच्याकडे तीन एकर सामायिक शेती आहे. 2018 मध्ये रवींद्रने 80 हजाराचे कर्ज काढले होते.सततच्या नापीकाने ते कर्ज भरू शकले नाही. सरकारची कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा त्यात त्यांच नावही आलं. मात्र, आधारच्या घोळने यांच्या कर्जमाफीची वाट अडवली आहे. अशीच परिस्थिती पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांची आहे. हा आकडा वर्धा जिल्ह्यात जरी कमी असलं तरी राज्यात मोठं आहे.

पहिल्या यादीचा 166 शेतकाऱ्यांपैकी 154 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणिकरण झाले आहे. या पैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमही वळती करण्यात आलीय. 8 शेतकरी आधारच्या घोळामुळे सध्या वंचित आहे, तर चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात पहिल्या यादीच्या लोणी गावातील कवडु सपाट आणि भगवान पिंपळकर यांचा समावेश आहे. तर येनगाव येथील सुलोचना धारपुरे आणि नत्थु पाटील यांचा समावेश आहे.

मागील सरकारच्या कर्जमाफी योजनेत शेतकरी ऑनलाइनच्या कचाट्यात सापडलेला होता, तर या सरकारने जाहीर केलेल्या योजनेत शेतकऱ्याला फक्त आधार प्रमाणिकरणाची गरज आहे. मात्र यातही अनेकांच्या आधारमध्ये असलेला घोळ शेतकऱ्यांसाठी मनस्ताप ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *