Mon. Dec 6th, 2021

ED ची नोटिस आली, तरी माझं थोबाड थांबणार नाही- राज ठाकरे

मुंबईमध्ये दिवसाला दोन सभा करताना पहिली सांताक्रुज येथे त्यांनी सभा घेतली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मनसेला राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष बनण्यासाठी मतदान करा, असं आवाहन केलं. हेच आवाहन गोरेगाव येथी सभेतही केलं. मात्र गोरेगावच्या सभेत ते जास्त आक्रमक होते.

गोरेगावच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

ED ची नोटिस आली, तरी माझं थोबाड थांबणार नाही.

ब्लू प्रिंट आणणारा मनसे हा पहिला पक्ष होता.

EVM आणि VVPAT संबधी देशात मी सोनिया गांधींपासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो.

मी सुचवलं होतं की या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा.

हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

मला ईडीची नोटीस आली, त्यावेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो की ‘ईडीची चौकशी लावा काही करा माझं थोबाड बंद होणार नाही’

हे ही वाचा- राज्याला प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची गरज आहे – राज ठाकरे

उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे कारण कोणी काही बोलत नाहीये.

आरेत 2700 झाडं कापली, आणि न्यायालयं देखील सरकारला साजेसं निर्णय देतं, बरं सरकारचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, ते ही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेनाप्रमुख म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजता का?

काय झालं शिवस्मारकाचं?

या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे. पण या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्यांना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत…

विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. बाळासाहेबांच्या वेळी माणसं बाहेरून आयात करावी लागत नव्हती.

तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे यावर अवलंबून आहे.

सरकार म्हणतंय की आम्ही 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या.

मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री ‘विहिरी’ म्हणत आहेत का?

आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे.

जाहीरनामे येणार आणि जाणार. तुम्ही भूलथापांना बळी पडणार…

तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही?

ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल.

बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला.

मेट्रोच्या कारशेडसाठी मी जागा सुचवली होती. आरेत कारशेड नको यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता.

सरकारला सांगितलं होतं की जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कारशेड करा.

पण सरकारला बीपीटीची जागा घशात घालायची आहे का?

सरकारचा आमच्या सणांना विरोध

आज मुंबईत, ठाण्यात वाट्टेल ती लोकं येऊन राहत आहेत, ती कुठून येत आहेत, काय करत आहेत याचा सरकारला पत्ता नाही.

पाकिस्तान, बांग्लादेश मधून आलेल्या घुसखोरांचे मोहल्लेच्या मोहल्ले उभे राहतात आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही पण आमच्या सणांना सरकार विरोध करतं, बंधनं आणतं.

कलम 370 चा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध?

आज महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या 370 कलमबद्दल बोलत आहेत.

370 कलम काढलं याबद्दल अभिनंदन.

पण याचा आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?

आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार?

आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार?

जपानकडून कर्ज घेऊन 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय?

काकोडकर समितीचा अहवाल आहे की देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त 1 लक्ष कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत?

या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, का? ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *