‘आरक्षणाशिवाय निवडणूक हा ओबीसींवर अन्याय’ – पंकजा मुंडे

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर सुनावणी केली आहे. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने वेळेत केले नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. यावर भाजप नेते पंकजा मुंड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक म्हणजे ओबीसींवर अन्याय आहे’, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकापुढे ढकलण्याची मागणी भाजप नेते पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडे पैसे नसतील तर आम्हाला सांगा, ओबीसींसाठी पैसा गोळा करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात ओबीसी समाज तीव्र भूमिका घेईल, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने तीन महिन्यांत इम्पेरिकल डेटा तयार करू शकतो असे म्हटले आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘जर राज्य सरकार तीन महिन्यांत हे काम करू शकत होते तर याआधी दुर्लक्ष का केले?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आणणाऱ्यांना हा समाज विसरणार नाही, असेही त्या म्हणाल्या.