Mon. Jan 24th, 2022

राज्यात काही ठिकाणी कर्मचारी आंदोलनावर ठाम

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची एसटी विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील काही ठिकाणी एसटी बससेवा सुरू झाल्या आहेत. मात्र सोलापूरमध्ये एसटी बससेवा अद्यापही ठप्प असल्याचे चित्र दिसत आहे.

सोलापूरमध्ये कर्मचारी संपावर ठाम

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणी मान्य होत नाही तोवर राज्यातील काही एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सोलापूरमध्ये अद्यापही एसटी बससेवा ठप्पच आहे. सोलापूरमध्ये एसटी बससेवा बंद असल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. पर्यायी वाहनांनी वाहतूक करण्यासाठी प्रवाशांकडून पैशांची लूट होत आहे. तसेच कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.

सांगलीत ५० टक्के कर्मचारी रुजू

राज्यसरकारने वेतनवाढ केल्यामुळे सांगली जिल्ह्यात ५० टक्के एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तसेच काही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र काही एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजेरी लावल्यामुळे सांगलीमध्ये आगारात एसटी बससेवेला सुरूवात झाली असून प्रवासी सेवा पूर्वपदावर आली आहे. सांगलीमध्ये ३०१ एसटी पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.

धुळ्यात सत्याग्रह मार्गाने आंदोलन

धुळ्यात कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह मार्गाने आंदोलन पुकारले आहे. धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवून अनोखे आंदोलन केले आहे. तसेच आंदोलनादरम्यान कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय धुळ्यातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

अहमदनगरमध्ये एसटीवर अज्ञाताकडून दगडफेक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता. दरम्यान शुक्रवारी पैठण, शनिवारी सकाळी अहमदनगर आणि श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *