Tue. Apr 7th, 2020

आपल्या एक्स-गर्लफ्रेण्डला गाडीखाली चिरडलं

नागपुरात मयुरी हिंगणेकर या तरुणीची गाडी खाली चिरडून हत्या केल्याची घटना पुढे आली. एकतर्फी प्रेमातून हे हत्याकांड घडल्याचं पुढे येत असून पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आणि पुढील तपास करत आहेत. नागपुरात घडलेल्या या हत्याकांड मुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मयुरी रविवारी रात्री आपल्या मित्रासोबत कोराडीला गेली होती. दोघेही रात्री अकराच्या सुमारास बर्डी परिसरात पोहचले. मात्र त्या ठिकाणी मयुरीच्याच जुन्या मित्राचे मित्र उभे होते. ते मयुरीला ओळखत होते. त्यांनी मयुरीला तू कोणासोबत फिरत आहे अशी विचारणा केली. त्यांच्यात काही शाब्दिक वाद झाला आणि मयुरी आपल्या मित्राच्या बाईकवर बसून निघून गेली. मात्र कार मध्ये बसलेल्या तिघांनी त्यांचा पिछा केला. ‘गांधी सागर’ तलावाच्या कॉर्नरवर बाईकला मागून धडक दिली. त्यातच मयुरीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मित्र अक्षय नागरगणे हा जखमी झाला.

 

या प्रकरणी पोलिसांनी आधी अपघाताची नोंद केली. मात्र पोलिसांनी अधिक तपास करत हत्येचा गुन्हा दाखल केला असून अनिकेत साळवे याला अटक केली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यात मयुरीच्या जुन्या मित्राचा सहभाग आहे का याचा सुद्धा पोलीस तपास करत आहे.

 

मयुरीच्या घरावर दुःखाचं सावट पसरलं आहे. मयुरी हिच आपल्या कुटुंबाचा आधार होती. घराची कर्ती मुलगी गेल्याने घरच्यांचे रडून रडून हाल होत आहेत. तिला वारंवार कोणाचे तरी फोन येत असत. घटनेच्या दिवशी सुद्धा फोन आला आणि ती बाहेर गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी आलीच नाही, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *