Wed. Oct 27th, 2021

#NationalVaccinationDay लसीकरण- सुरक्षेचं कवच

16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. बाळ जन्माला आलं की घरच्यांच्या लाड आणि प्रेमाने अगदी न्हाऊन निघतं. मात्र बाळाचं आरोग्य संभाळणं हे कुटुंबाचं मुख्य कर्तव्य असतं. बाळाचा जन्म झाल्यावर त्याचं आयुष्य सुरक्षित आणि सुखरूप पार पडावं अशी प्रत्येक जन्मदात्या पालकांची इच्छा असते. त्यादृष्टीने बाळाच्या सुरक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय करायला हवा, हा उपाय म्हणजे लसीकरण.

जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण. पण याचसोबत पुढचा टप्पा येतो तो ख-या लसीकरणाचा. यामुऴेच आजारावर नियंत्रण मिळवता येते, आजारची तीव्रता कमी करता येते. प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो.

पोलिओ

जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात.

पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी 1952 साली यशस्वीरीत्या शोधून काढली.

या पध्दतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला.

हे जीवाणू शरीरात स्नायूंमार्फत टोचून दिले जात.

नंतर अल्बर्ट सबिन यांनी तोंडात थेंबाद्वारे लस देण्याची पद्धत शोधून काढली.

पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत.

कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विषाणुंना संपवते.

या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मुलनातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

असं केल्यामुळे आणि या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे.

गेल्या 20 वर्षांमध्ये 3,50,000 वरून पोलिओ रुग्णांची संख्या 1500  पर्यंत घटली आहे.

नवजात अर्भकाचे लसीकरण कधी करावे?

वय

6 आठवडे : डीपीटी पोलिओ आणि हेपेटायटिस बी व एचआयबी

10 आठवडे : डीपीटी, पोलिओ व हेपेटायटिस बी व एचआयबी

14 आठवडे : डीपीटी, पोलिओ व हेपेटायटिस बी व एचआयबी

9 महिने : गोवर( MMR)

लहानपणी लसीकरण करून गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

डिप्थेरिया, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, गालगुंड, रुबेला, हेपटायटिस ‘ए’, हेपटायटिस ‘बी’, एच एन्फ्ल्युएंझा ‘बी’, न्युमोकोअल डिसीज, कांजण्या, रोटाव्हायरल डायरिया, पोलिओ, टायफॉइड इन्फ्ल्युएंझा आणि काही प्रमाणात क्षयरोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो.

यापैकी क्षयरोग (बीसीजी) डिप्थेरिया, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), एच इन्फ्ल्युएंझा बी (एचआयबी), हेपटायटिस बी, गोवर, गालगुंड, रुबेला (एमएमआर) आणि पोलिओची लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

‘या’ बाबतीत काळजी घ्या-

गर्भवतीचे धनुर्वातापासून रक्षण न केल्यास तिच्या आय़ुष्याला धोका संभवतो.
टिटॅनसचे जंतू मुख्यतः उघड्या जखमांमध्ये वाढतात.

अस्वच्छ चाकूने नाळ कापल्यास किंवा नाळेच्या टोकास कोणत्या ही जंतूसंसर्ग वस्तूचा स्पर्श झाल्यास तेथे हे जंतू लगेच शिरकाव करतात. कोणतंही हत्यार वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धुवा, उकळा किंवा तापवून थंड करा व नंतरच वापरा.

जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळाची नाळ स्वच्छ ठेवा.
सर्व गर्भवतींनी आपले धनुर्वातविरोधी लसीकरण झाल्याची खात्री करून स्वतःला तसेच होणाऱ्या बाळाला सुरक्षित ठेवावं.

गर्भवतीने धनुर्वातविरोधी लसीकरण करणं पूर्णपणे सुरक्षित आहे.

लसीकरणाचं वेळापत्रक –

पहिला डोस – गर्भ राहिल्याचे कळल्याबरोबर लगेच

दुसरा डोस – पहिल्या डोसनंतर एक महिन्याने आणि बाळंतपणाच्या संभाव्य तारखेच्या दोन आठवड्यापेक्षा जास्त उशीरा नसावं.

तिसरा डोस – दुसऱ्या डोसनंतर सहा ते 12 महिन्यांनी

चौथा डोस – तिसऱ्या डोसनंतर एका वर्षाने किंवा पुढील गर्भधारणेच्या दरम्यान

पाचवा डोस – चौथ्या डोसनंतर एका वर्षाने किंवा पुढील गर्भधारणेच्या दरम्यान

योग्य कालावधीने दिलेल्या पाच अशा डोसनंतर त्या मातेस उर्वरित आयुष्यात धनुर्वातापासून कायमचे संरक्षण मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *