सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

प्रकाश शिंदे, सातारा
सावकाराकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. याबाबत संबधित पोलीस अधिकारयाच्या दुर्लक्षित पणामुळे हा प्रकार घडला असल्याने संबधित सावकारांबरोबर पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खटाव तालुक्यातील वडुज येथे सावकारीच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
पांडुरंग उर्फ दादासो ज्ञानदेव यादव असे शेतकऱ्याचं नाव आहे. तक्रार अर्ज देऊन सुद्धा पोलिसांनी याची दखल घेतली नसल्यामुळे हे टोकाचे पाऊल पांडुरंग उर्फ दादासो यादव यांनी उचललं.
या प्रकरणी पोलिसांनी खाजगी सावकारी करणारया तिघांसह आदींवर गुन्हा दाखल केला आहे
का केली आत्महत्या?
मयत शेतकरी पांडुरंग दादासो ज्ञानदेव यादव यांचा मुलगा विजय यादव याने काही वर्षापूर्वी खासगी सावकाराकडून चार लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते.
त्याबदल्यात खाजगी सावकाराने साडे चार रुपयांचा चेक घेतले होते.
या रक्कमेपैकी अखेर दोन लाख रुपयांची रक्कम आणि मायणी अर्बन बँकेच्या चेक ने 2 लाख 72 हजार असे मिळून 4 लाख 72 हजार जाधव यांच्या अकाउंट मध्ये जमा करुन घेतले होते.
मयत शेतकऱ्याच्या मुलाची इनोव्हा गाडीदेखील दमदाटी करुन नेली होती.
त्यानंतरही तगादा कायम होता.
याच खासगी सावकाराच्या तगादयाला कंटाळून यापूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज पोलीस निरीक्षक यांच्याकडे खासगी सावकारीच्या विरोधात तक्रारी अर्ज दिलेला होता.
मात्र यावर पोलिसांनी कोणतीही दखल अथवा कारवाई न केल्याने आणि खाजगी सावकारांच्या तगादा मागे लागल्याने पांडुरंग यादव यांनी अखेर शनिवारी सायंकाळी वडुज येथील पेडगाव रोड जवळ विठ्ठलनगर परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटना स्थळावर त्यांच्या कुटूंबातील मुलगा आणि नातेवाईक यांनी आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी आणि पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्यावर आणि खासगी सावकार संजय किसन जाधव, त्याचा साथीदार किरण लोहारा आदींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
संपूर्ण कर्जाची रक्कम भरुन देखील व्याजाची रक्कम मिळवण्यासाठी केलेला सावकाराने खटाटोप निष्पाप शेतकऱ्याच्या आत्महत्येचं कारण ठरला. यामुळे सावकारांच्या बरोबरीने निर्दयी झालेल्या पोलीस प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जनसामान्यातून होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.