अखेर वर्ध्यात बिबट्या जेरबंद

वर्धामधील सावंगी येथे शालिनीताई सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्य परिसरात सकाळच्या सुमारास बिबट्या आढळला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर सहा तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग, पीपल फॉर ऍनिमल आणि पोलिसांना यश आले आहे.
शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला सकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या परिसरात बिबट्या आढळून आला. बिबटा दिसल्याचे कर्मचाऱ्याने वन विभाग आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचा सापळा रचला. मात्र त्या दरम्यान बिबट्या लगतच्या नालीत जाऊन शिरला. बिबट्याला नालीतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिस आणि वन विभाग अधिकाऱ्यांकडून सुरू होते.
नाली लहान असल्यामुळे बिबट्याल बाहेर येता येत नव्हते. त्यावेळी जेसीबीच्या मदतीने एका बाजूने नाली खोदण्यात आली. आणि दुसऱ्या बाजूने बिबट्याच्या कमरेवर बेशुद्ध करण्याऱ्या औषधाचा मारा करण्यात आला. आणि अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिक आणि रुग्णालयाच्या प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.