Mon. Dec 6th, 2021

सुवर्णपदक मिळवणारा नीरज पहिला भारतीय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.

भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही.

भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *