अनंत कारमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

गेल्या काही दिवसांपासून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एका अभियंत्याला झालेल्या मारहाणीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आव्हाड यांच्याविरोधात सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याच्या आरोपावरून अनंत कारमुसे नामक इंजिनिअरला आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केलं. या पाचही जणांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनाही या प्रकरणी आरोपी केलं जावं, अशी मागणी भाजपाने केली आहे. तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. याशिवाय संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही भाजपाने केली आहे.
अनंत कारमुसे यांच्या मारहाण प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तिघांचा सहभाग असल्याची माहितीही पुढे आली आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कारवाई करत ५ जणांना अटक केली आहे.