Thu. Dec 2nd, 2021

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंह यांचं निधन झालं आहे. विरभद्र सिंग यांनी प्रदीर्घ आजारामुळे गुरुवारी पहाटे ३.४० वाजता शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

वीरभद्र सिंह यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांनी दोन वेळा कोरोनावर मात केली होती.

सध्या वीरभद्र सिंह सोलन जिल्ह्यातील अरकी येथून आमदार होते. त्यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले. १९८३ मध्ये मुख्यमंत्री ते पहिल्यांदा बनले. सलग दोन वेळा ते १९९० पर्यंत या पदावर होते. यानंतर १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ असे मुख्यमंत्री राहिले होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार, तसेच पाच वेळा खासदार म्हणूनही निवडून आले होते. वीरभद्र सिंह हे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात २००९ मध्ये केंद्रीय मंत्रीदेखील होते.

वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आणि मुलगा विक्रमादित्य सिंहदेखील राजकारणात सक्रीय आहेत. प्रतिभा सिंह ह्या माजी खासदार असून विक्रमादित्य सिंह हे शिमला ग्रामीणमधून आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *