Tue. Oct 27th, 2020

गणेश नाईकांनी कथकल्ली सुरू केली- जितेंद्र आव्हाड

नवी मुंबईच्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना खंडणीखोर म्हटल्याने गणेश नाईक यांनीही प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांना आपल्यावरील गुन्हे सिद्द करायचं आव्हान दिलं होतं. नाना पाटेकर यांचा डायलॉग म्हणत ‘ये तेरे बस की बात नही, तेरे बाप को बोल’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांची खिल्ली उडवली होती. त्यावर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना चिथावलं आहे.

“मी एकदा काय नवी मुंबईत येऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरू केली. अजून तर मी 100 वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही जाणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा” असं Tweet करत आव्हाड यांनी व्हिडिओ देखील पोस्ट केलाय.

काय म्हणाले होते यापूर्वी जितेंद्र आव्हाड?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तसंच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईच्या मेळाव्यात NCP मधून भाजपात गेलेल्या गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. गणेश नाईक यांना कोरोना व्हायरसचा ब्रॅड अँबेसिडर करा, असा टोमणा मारत गणेश नाईक खंडणीखोर असल्याची टीका केली होती. रेती आणि उद्योगधंद्यांमधील खंडणी गणेश नाईक वसूल करत स्वतः मोठे झाले, पण एकाही कार्यकर्त्याला त्यांनी मोठं केलं नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला होता. तसंच मुलाच्या तिकिटावर स्वतः उभं राहून लेकाचाच राजकीय बळी गणेश नाईक यांनी घेतला, असं विधानही त्यांनी केलं.

आव्हाड यांना नाईकांचं आव्हान

जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला चढवल्यावर गणेश नाईक यांनीही जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलं. आपण जर खंडणीकोर आहोत तर आपल्याविरोधात पोलिसांत साधी NC पण नाही, याची आठवण नाईक यांनी करून दिली. तसंच जर आपण खंडणीखोर असू, तर आपल्याविरोधातील पुरावे सादर करा आणि केस करा, असं आव्हानही त्यांनी आव्हाड यांना दिलं. यावेळी नाना पाटेकर यांचा डायलॉग म्हणत ‘ये तेरे बस की बात नही है, जा अपने बाप को बुला… और नाम पुछ तो बोल गणेश नाईक’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना उत्तर दिलं होतं.

त्यावर पुन्हा आता जितेंद्र आव्हाड यांनी Tweet केल्यामुळे दोघांमध्ये पेटलेला वाद चांगलाच वाढणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *