पालघर समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन

पालघर : थंडीची चाहूल लागताच पालघरमधील पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पाहुण्याचं आगमनाला सुरुवात झाली आहे. पालघरमधील समुद्रकिनारी वाढवण, चिंचणी, डहाणू खाडी भागात सध्या परदेशी पक्षी स्थलांतरित झालेले पहायला मिळतात.
सध्या या किनाऱ्यावर कलहंस हा आकर्षक पक्षी वास्तव्यास आला आहे. कलहंस या पक्षाला इंग्रजीत greylag goose असे म्हणतात. तसेच हा हिवाळी पाहुणा रंग, रूप आणि आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो.
शेपटीकडील भाग करडा, चोच मांसल गुलाबी असा आकर्षक असून हा पक्षी पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळून येतो.
मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात कलहंस दुर्मिळ असून दक्षिणेकडे आढळून येत नाहीत. हा पक्षी नद्या, सरोवरे, धनाची शेती आणि गवती कुरणे अशा भागात आढळून येतो. सध्या हा पक्षी पालघर जिल्ह्यातील चिंचणी, वाढवण या पश्चिम किनारपट्टी भागात आला आहे.
चिंचणी येथील पक्षीमित्र प्रवीण बाबरे यांनी हा पक्षी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.