Sun. Jun 13th, 2021

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी करसुधारणा; जीएसटीमुळे देशभरात एका वस्तूवर समान कर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू

आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली.

 

जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या

ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अ‍ॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमलेले सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, काही राजकीय नेते यांच्या उपस्थित पार पडलेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी

म्हणाले, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार

आहेत, असेही मोदी म्हणाले.

 

जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका

नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले. 6 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली बैठक झाली, ती याच सेंट्रल

हॉलमध्ये, सेंट्रल हॉलची जागा अनेक राष्ट्रपुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यामुळे देशाला नव्या वाटेने नेणाऱ्या जीएसटीचा स्वीकार करण्यासाठी यासारखी दुसरी

जागा असू शकत नाही, असंही मोदी म्हणाले.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश एकसंध ठेवण्याचे काम केले. त्यांनी ते एकीकरण केले नसते, तर देश विखुरला असता. आज जीएसटीच्या माध्यमातून आर्थिक

एकीकरणाचे काम झाले आहे. राज्यघटनेचा स्वीकार करताना याच सेंट्रल हॉलमध्ये ज्या पद्धतीनं विचारविमर्श झाला, वादांमधून सामोपचाराने मार्ग निघाला, त्याच

पद्धतीने जीएसटी काऊन्सिलने, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षांनी सहयोगातून जीएसटीची पारदर्शक व्यवस्था सिद्ध केली आहे. या रूपात देश एका आधुनिक

सुलभ आणि पारदर्शक व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना त्यातून आळा घालण्याचे काम होणार आहे. मुख्य म्हणजे

यामुळे इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल आणि प्रामाणिक व्यापा-यांची जाचातून मुक्तता होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *