राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा

कोरोनाचं संकट राज्यावर पसरलं असताना त्यांच्याशी लढताना अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थितीदेखील कार्यालयांत ५ टक्क्यांवर आणण्यात आली. मात्र या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत महाराष्ट्रातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली. जिल्हा सहकारी बँकांमधून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी घोषित केलं होतं. तर २०१७ ते २०१९ दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जर जून २०२० पर्यंत परतफेड केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना २०१८ मध्ये घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपये प्रोत्साहनपर दिले जाईल. मात्र ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.