झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मानले ठाकरे सरकारचे आभार

कोरोनाचं संकट देशावर असताना सर्वत्र २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. ते कुठेही जाऊ शकत नाहीत. दुसऱ्या राज्यात कामानिमित्त काही काळासाठी गेलेले लोकदेखील आता तेथेच अडकून पडले आहेत. महाराष्ट्रात ठाकरे सरकारने अशा लोकांसाठी मोठी मदत उपलब्ध करून दिली आहे. झारखंड येथून आलेल्या आणि महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने हरेक मदत केली आहे. याबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांवर तसंच कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी अडकलेल्या झारखंड आणि इतर प्रांतातील कामगारांवरही संकट ओढावलं आहे. त्यांना घरी परतणं कठीण झालं आहे आणि महाराष्ट्रात त्यांना योग्य निवाराही नाही. अशावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा ७० हजार कामगारांसाठी शेकडो कॅम्प उभे करून त्यांची व्यवस्था केली आहे. एवढंच नव्हे, तर या सर्वांच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. Tweet करून त्यांनी झारखंडच्या नागरिकांना अशीच मदत करत राहावी, अशी विनंतीदेखील सोरेन यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोरेन यांच्या Tweet ला प्रतिसाद दिला. सोरेन यांना निश्चिंत राहण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे. झारखंडच्या बांधवांना आम्ही सर्व ती मदत करू. आमचं ते कर्तव्य आहे. असं ठाकरे यांनी म्हटलंय.