वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता दिवे लावण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे. गृहनिर्माण मंत्री यांनीही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जीवनावश्यक वस्तुंवर बोलतील अशी आशा होती. भारतातला कोणताही गरीब नागरिक उपाशीपोटी झोपणार नाही, यावर बोलतील. मास्क, सॅनिटायजर आणि औषधांची उपलब्धता मुबलक प्रमाणावर असेल. कोणालाही औषंध कमी पडणार नाही, यावर बोलतील.
नवी लस शोधून काढतोय, यावर बोलतील. टेस्टिंग कीट कमी पडणार नाही, यावर बोलतील. देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटलं होतं.
अंधार करा आणि लाईट पेटवा
सगळ्यांच्या आयुष्यात अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडून उजेड आणण्याची आवश्यकता आहे, गरज आणि अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान म्हणतात, अंधार करा आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवा. पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा, असं का वाटतं, असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला. हा सर्व मुर्खपणा असल्याचं आव्हाड म्हणाले.
मी आज जाहीर करतोय. मी काम करतोय. मी गरीबांमध्ये जातोय. गरीबांना जेवण देतोय. तेलात आणि मेणबत्त्यांना लागणारे पैसे पण मी गरीबांना देणार. पण मी माझ्या घरातील लाईट सुरु ठेवणार, आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही, असं ठणकावून आव्हाडांनी सांगितलं. तसंच मी मूर्ख नाही, असंही आव्हाड म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही मोदींवर टीका केली आहे.