‘ओणम’ सणाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

‘ओणम’ हा सण दक्षिण भारतातील केरळमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण असतो. केरळातल्या घराघरात हा सण साजरा केला जातो. हा सण जरी तेथील हिंदू पुराणकथेशी जोडलेला असला, तरी धर्माची दरी न ठेवता प्रत्येक मल्याळी कुटुंबात हा सण प्रमाणावर साजरा होतो.
काय आहे या सणामागची पौराणिक कथा?
भक्त प्रल्हादचा नातू आणि असूर राजा महाबळी याची ही कथा आहे. राजा महाबळी हा उदार होता. भगवान विष्णूंचा भक्त होता. त्याच्या पराक्रमामुळे देवांचा राजा इंद्रही घाबरला होता. त्याने भगवान विष्णूला साकडं घातलं. तेव्हा भगवान विष्णूने वामनाचं रुप धारण केलं आणि दानशूर महाबळीकडे आला. लहानग्या वामनाने महाबळीकडे तीन मागण्या केल्या. तीन पाऊलं ठेवण्याइतकी जमीन वामनाने मागितली. पहिल्या पावलात वामनाने पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात त्याने स्वर्ग व्यापला. तेव्हा महाबळीला जाणीव झाली, की हा बटू वामन कुणी साधारण बालक नसून साक्षात भगवान विष्णू आहेत. तेव्हा महाबळी ने तिसरं पाऊल वामनाने आपल्या मस्तकावर ठेवावं, अशी इच्छा व्यक्त केली. वामनाने महाबळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात ढकलून दिलं. पाताळाचं राज्य महाबळीला मिळालं. महाबळी पाताळात राज्य करण्यास राजी झाला. मात्र वर्षातून एकदा आपल्याला केरळ राज्यात येऊन आपल्या प्रजाजनांना पाहण्याचं वरदान त्याने वामनाकडे मागितलं. भगवान विष्णूंनी त्याला परवानगी दिली. तेव्हा ओणम हा तो दिवस असतो, जेव्हा राजा महाबळी पाताळातून आपल्या प्रजाजनांना पाहण्यासाठी केरळमध्ये येतो अशी मान्यता आहे. त्याच्याच स्वागतासाठी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
या सणापासून मल्याळम नववर्षाचा आरंभ होतो. हा उत्सव तब्बल 10 दिवस चालतो. पहिला दिवस ‘अथम’ आणि दहावा दिवस ‘तिरुओणम’ असतो. दहाव्या दिवशी केळीच्या पानावर 11 विविध खाद्यपदार्थ मांडले जातात. सहकुटुंब भोजन केलं जातं.
या सणाच्यावेळी पारंपरिक नृत्य, नाटकं, गायनादी कार्यक्रम केले जातात.
विविध खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. हत्तींना सजवलं जातं.
महिला सोनेरी काठाची पांढरीशुभ्र साडी परिधान करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्ती स्वहस्ते नवे कपडे घरातल्या मंडळींना देतात.
महिला घराबाहेर फुलांची सुंदर रांगोळी काढतात.
आपल्याकडे जशी मंगळागौर असते, तशाच प्रकरचा महिला आणि मुलींचा खेळ या दिवसांत होतो. या खेळाला ‘कैकोटीवकळी’ म्हणतात.
पाचव्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण बोटींच्या शर्यती लावल्या जातात. या शर्यती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या शर्यती अत्यंत नेत्रदीपक असतात.
चेंडूचा पारंपरिक ‘नाटन’ खेळही खेळला जातो.
ओणम हा सण दक्षिण भारतातील केरळमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण असतो. केरळातल्या घराघरात हा सण साजरा केला जातो. हा सण जरी तेथील हिंदू पुराणकतेशी जोडलेला असला, तरी धर्माची दरी न ठेवता प्रत्येक मल्याळी कुटुंबात हा सण प्रमाणावर साजरा होतो.