‘महा’बजेट- 2020- महत्त्वाचे मुद्दे

फोटो सौजन्य- ANI
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलच्या करातील वाढ, घरांच्या किंमती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अर्थसंकल्पात काय निर्णय घेण्यात आले आहेत, ते पाहुया.
2020-21 अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे –
2 लाखांच्या वर रकमेचं कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची रक्कम सरकार देणार. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफही होणार आणि प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये सरकारच देणार. पीकविमा योजनेसाठी 2 हजार 34 कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार. शेतीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी वर्षाला 1 लाख या प्रमाणे 5 लाख सौरपंप बसवणार. यासटी 670 कोटींची तरतूद केली जाणार आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहाय्यता मिळणार.
बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी मुंबई MMRDA रिजन आणि पुणे, पिंपरी-चिंचवड येथील घराच्या रजिस्ट्रेशनवरील स्टॅम्प ड्युटीवर 1 टक्का सवलत दिली जाणार.
राज्यातील रस्ते विकासासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी पुरवला जाणार.
पुणे मेट्रोला 5 वर्षांतील सर्वात जास्त निधी 2020-21 या वर्षात दिला जाणार.
राज्याचा महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या करावर 1 रुपया प्रतिलिटर वाढ होणार.
आमदारांच्या विकासनिधीत 1कोटी रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे आमदारांना दरवर्षी मिळणाऱ्या 2 कोटी रुपये निधीऐवजी 3 कोटी रुपये विकास निधी प्राप्त होणार आहे.
दहावीची परीक्षा पास झालेल्या मुला, मुलींसाठी ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना’ ही येजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेनुसार 21 ते 28 वयोगटातील मुलांसाठीच्या या योजनेसाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
आरोग्यासाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
राज्यातल्या जिल्हा क्रीडा संकुलांसाठी 25 कोटी रुपयांची भक्कम तरतूद करण्यात येणार.