Sat. Aug 13th, 2022

सोलापुरात बेमोसमी पावसामुळे ४० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

ऐन थंडीच्या दिवसांत मागील आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सोलापुरात अवकाळी पावसाने झोडपले असून शेतकऱ्यांच्या फळपिकांचे नुकसान झाले आहे. बेमोसमी पावसामुळे सोलापूरमधील ४० हजार हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या बेमोसमी पावसामुळे ६८ हजार ५७२ शेतकऱ्यांचे ४० हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ६०३ जिरायत, १८ हजार ८२५ हेक्टर बागायत आणि २१ हजार ३५६ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले  आहे.

सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा ८४३ गावांना फटका बसला असून ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचा कृषी विभागाने अंदाज वर्तवला आहे.

आंबा उत्पादकांना फटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. आंब्याच्या बागेत केलेल्या फवारण्या, साफसफाई, खत व्यवस्थापन याचा केलेला शेतकऱ्यांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याना आलेला मोहोर गळून गेला तर काही ठिकाणी कुजून गेला आहे. तर येणारा मोहोर कुजून जाणार आहे. त्यामुळे आंबा पिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आंबा सिझन एक महिना पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिकसह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस बरसला. अनेक सखल भागात पाणी साचले असून नाशिक जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. डिसेंबर महिन्यातील या २४ तासांतील पावसामुळे ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. अवेळी आलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक द्राक्षबागेत पाणी साचल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.