Sun. Jan 16th, 2022

‘कशा असतात ह्या बायका’ लघुपटात तेजश्री हटक्या भूमिकेत

  ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील घराघरात पोहचलेली शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘कशा असतात ह्या बायका’ या मराठी लघुपटात तेजश्रीने आगळीवेगळी भूमिका साकारली आहे.

  तेजश्रीने लघुपटाबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तीने लिहिले की, ‘भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी… आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट’.

  घर, कुटुंब आणि करिअर या तीनही गोष्टी सांभाळणाऱ्या महिलांवर आधारित ‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत अभिनेता अभिजीत खांडेकर आणि मराठीत पदार्पण करणारा अभिनेता मयुर मोरे या लघुपटात मुख्य भूमिकेत आहे. भाऊ-बहिणीचे नात्याची भूमिका साकारत तेजश्री आणि अभिजीत यांची जोडी पहिल्यांदाच सोबत पाहायला मिळणार आहे.

  कॉटनकिंग प्रस्तुत ‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट फेसबुक, युट्यूब व इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहे. कॉटन किंगचे संचालक आणि लघुपटाचे प्रस्तुतकर्ते कौशिक मराठे यांनी सांगितले की, ‘आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणे बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे.’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *