Jaimaharashtra news

भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं; बेल्जियमची भारतावर ५-२ ने मात

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्न आज भंग पावलं आहे. बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा ५-२ च्या फरकाने पराभव झाला आणि भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.

सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचं फायनल्स गाठण्याचं स्वप्न भंगलं असून बेल्जियमनं फायनल्समध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदक आणि रौप्य पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला असला तरी अद्यापही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.

सेमीफायनल्स सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दरम्यान, संघाला या पेनल्टी कॉर्नवर गोल डागता आला नाही. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि हेड्रिंक्सनं आणखी एक गोल डागला. या गोलसह बेल्जियमने भारतावर 5-2 अशा फरकानं विजय मिळवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारतीय हॉकी संघाला संदेश

दरम्यान सामना संपल्यानंतर ‘जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा भाग आहे. आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि तेच फार महत्वाचं आहे. पुढील सामन्यासाठी तसेच भविष्यातील वाटचालीसाठी मी संघाला शुभेच्छा देतो. भारताला या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे’, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

Exit mobile version