‘भारताच्या विकासाचा मार्ग पाकिस्तानातून जातो’, शोएब अख्तरचा दावा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे अनेकदा प्रयत्न करूनही सुधारण्याचं नाव घेत नाहीत. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊनही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया काही थांबत नाहीत. अनेकदा युद्ध आणि 26/11 पासून ते पुलवामासारखे हल्ले यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांवरील पाकिस्तानसोबतचे संबंध भारताने तोडले आहे. याचाच परिणाम दोन्ही देशातील खेळांचे सामने तसंच कलाकारांवरही होत असतो.
दहशतवाद हा दोन्ही देशांमधील शत्रुत्वाचा मुख्य मुद्दा आहे. काश्मिरप्रश्न हे देखील या वादाचं महत्त्वाचं कारण आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये होणारे क्रिकेटचे सामने रद्द केले जातात. तसंच विश्वचषकाव्यतिरिक्त दोन्ही संघ आभावानेच एकमेकांविरोधात खेळतात. पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि माजी गोलंदाज शोएब अख्तरने यासंदर्भात केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
‘भारताच्या विकासाचा मार्ग पाकिस्तानातून जातो’ असा दावा शोएब अख्तरने केला आहे. एका चॅनलवरील चर्चासत्रात त्याने हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना भारताची तारीफही केली आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
भारत देश सुंदर आहे आणि तेथील माणसंही खूप चांगली आहेत.
पाकिस्तानशी युद्ध करण्याची त्यांना इच्छा आहे, असं कधीच वाटत नाही.
मी भारतभर फिरलो आणि त्यावरून मी हे नक्की सांगू शकतो की, भारताला पाकिस्तानासोबत जुळवून घेण्याची इच्छा आहे.
पाकिस्तानासोबत काम करण्यासाठी भारत आतुर आहे.
भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानातूनच जातो, हे मला माहीत आहे.
मात्र याउलट मी जेव्हा भारतीय वृत्तवाहिन्यांवर जातो, तेव्हा उद्याच दोन्ही देशांत युद्ध होईल असं वाटायला लागतं, असंही शोएब अख्तरने म्हटलं आहे.