Tue. Mar 31st, 2020

इंदुरीकर महाराजांकडून आता शिक्षकांची खिल्ली, शिक्षक संघटना नाराज

लिंगभेद करणारं वक्तव्य करण्यावरून आधीच टीका होऊ लागलेले ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या सत्संगाची आणखी एक क्लिप व्हायरल होऊ लागली आहे. या मध्ये इंदुरीकर महाराज शिक्षकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात, असा विषय घेऊन त्यांनी टीका केली आहे. यामुळे शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.

काय म्हणाले आता इंदुरीकर महाराज?

शिक्षक शाळेमध्ये शिकवताना कसा वेळ घालवतात, असं या क्लिपमध्ये इंदुरीकर महाराजांनी वर्णन केलंय.

35 मिनिटांच्या तासिकेत शिक्षक वर्गात येण्यासाठी 5 तास घालवतात, फळा पुसण्यात 5 मिनिटं घालवतात, 5 मिनिटं अदल्या दिवशी काय झालं हे सांगण्यात घालवतात आणि उद्याच्या तासाला काय शिकवणार आहोत, हे सांगण्यात 5 मिनिटं घालवतात. त्यामुळे नंतरच्या वेळेत फक्त तास संपला, एवढंच सांगायला वेळ मिळतो आणि शिक्षक आपली तासिका आटोपती घेतात, असं विनोदी पद्धतीने इंदुरीकर महाराजांनी वर्णन केलंय.

या क्लिपमधील इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानांमुळे शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. स्वतः इंदुरीकर महाराज शिक्षक आहेत. त्यामुले अशा पद्धतीची वक्तव्यं करून शिक्षकांची प्रतिमा खराब करू नये, असं आवाहनही शिक्षक संघटनांनी केलं आहे.

शिक्षक वर्गात शिकवतच नाहीत, तर टाईमपास करतात, असा अर्थ इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यांतून निघतो. मात्र वास्तव तसं नाही. अशा पद्धतीने शिक्षकांची खिल्ली उडवणं योग्य नसल्याचं मत शिक्षक संघटनांकडून व्यक्त होतंय. समाज प्रबोधनाच्या नावाखाली शिक्षकांसारख्या गौरवास्पद कार्य करणाऱ्या लोकांचा अपमान इंदुरीकर महाराजांनी करू नये, असं शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *