Mon. Sep 20th, 2021

अखेर ‘त्या’ वक्तव्याबद्दल इंदुरीकर महाराजांची दिलगिरी

गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादळानंतर अखेर इंदुरीकर महाराजांनी माफीनामा सादर करत दिलगीर व्यक्त केली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम संख्येला केल्यास मुलगी’ असं विधान आपल्या कीर्तनात केल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली होती.

त्यानंतर उद्विग्न झालेल्या इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करण्याचा मनोदयही बोलून दाखवला होता. समाजसेविका तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे, तर अंनिसनेही या विधानावर आक्षेप घेतला होता. त्याविरोधात अनेक नेते आणि वारकरी संप्रदायाची मंडळी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ दंड थोपटून उभी राहिली. मात्र अखेर इंदुरीकर महाराजांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

काय म्हटलंय माफीनाम्यात?

महाराष्ट्रातील तमाम किर्तनकार,वारकरी कथाकार,शिक्षक शिक्षीका,डॉक्टर ,वकील आणि माता समान असलेला तमाम महीला वर्ग

आज सात आठ दिवसा पासून माझ्या किर्तनरुपी सेवेतील त्या वक्तव्यामुळे सोशल मिडिया व इलेक्टॉनिक मीडीयासह इतर समाज माध्यमात माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

तरी मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाज प्रबोधन, समाज संघटन, अंधश्रध्दा निर्मुलन तसंच समाजातील विविध जाचक रुढी आणि परंपरा यांच्या खंडनावर भर दिला होता.

माझ्या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असे पत्रक काढून इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *