नव्या नाट्यारंभासाठी नाट्यसृष्टी सज्ज
नाटय व्यवसायासाठी ‘जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघा’ची महत्त्वाची पावले…

जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नाटक पुन्हा सुरु होत असतानाचे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. 14 मार्च 2020 पासून नाटयगृह बंद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा नाट्यगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. आता नाटक पुन्हा सुरु होत असल्याने प्रेक्षकांसह नाट्यसृष्टीही आनंदी आहे. अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा 12 आणि 13 डिसेंबर रोजी पुण्यात प्रयोग होणार आहे. आणि या नाटकाने नाट्यारंभाला सुरुवात होईल. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित प्रशांत दामले यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हटले की, “आमचा आणि प्रेक्षकांचा उत्साह सारखा असल्याचं मला जाणवलं. आमचीही जबाबदारी वाढलेली हे. पहिल्या प्रयोगाला ज्या पद्धतिने रिहर्सल केल्या होत्या त्याच पद्धतिने पुन्हा आमच्या रिहर्सल सुरु झालेल्या आहेत. याशिवाय शासनाने जे नियम दिलेले आहेत ते आपण पाळणं गरजेचं आहे. मला खात्री आहे नाट्यरसिक हे सर्व नियम पाळतील.” तर या पत्रकार परिषदेला उपस्थित अभिनेता सुनील बर्वे यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते सांगतात की, “मला प्रेक्षकांचं अभिनंदन करावसं वाटतं. खूप दिवस ते थांबले आहेत आणि ऑनलाईन पद्धतिने त्यांनी त्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांची जी मूळ आवड आहे नाटक पाहण्याची ती त्यांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. आम्ही ज्या उमेदीने आणि प्रयत्नांनी हे घडवून आणत आहोत त्या प्रयत्नांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याने यश मिळालेलं आहे.”