उद्धव ठाकरे यांना माझा सलाम- जावेद अख्तर

कोरोना व्हायरसचं संकट जगावर गंभीर परिणाम करत असताना देशावरही त्याचं सावट आहे. हजारो लोक कोरोनाग्रस्त असल्याचं समोर येतंय. यातील आकडेवारी वाढतच आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र असाही परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेला ज्या आश्वासक पद्धतीने दिलासा देत आहेत, त्यांना योग्य त्या सूचना न घाबरवता देत आहेत, त्याचं सर्व थरांतून कौतुक होतंय. शिवसेनेच्या भूमिकेवर अनेकवेळा टीका करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं कौतुक केलंय.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्या पद्धतीने कोरोना व्हायरस संबंधित स्पष्ट निर्देश देत आहे, तसंच ज्या प्रकारे गंभीर परिस्थिती हाताळत आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांना माझा सलाम, असं जावेद अख्तर यांनी Tweet केलं आहे.
जावेद अख्तर हे कायम शिवसेनेच्या विरोधातील भूमिका घेणारे म्हणून ओळखले जातात. मात्र त्याचवेळी ते अत्यंत वस्तुनिष्ठ विचारवंत मानले जातात. लॉकडाऊन दरम्यान सर्व धर्मस्थळं बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. तरीही काही ठिकाणी मशिदींमध्ये सार्वजनिकरीत्या नमाज पढले जात आहेत. जावेद अख्तर यांनी त्यावर टीका करत मशिदी बंद करण्याची मागणी केली आहे.