‘जय महाराष्ट्र Impact’: 73 वर्षं अंधारात असणाऱ्या लखमापूर गावात 1 आठवड्यात पोहोचली वीज

लखमापुर गावात स्वतंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही वीज पोहोचली नसल्याची बातमी ‘जय महाराष्ट्र’ने दाखवताच महावितरणने त्याची दखल घेतली आहे. जीवती येथील उप कार्यकारी अभियंता महेश राठौड़ यांनी येत्या दहा दिवसांत या गावात वीज पोहोचवण्याचं आश्वासन ‘जय महाराष्ट्र’ ला दिलं. त्यानुसार उपकार्यकारी अभियंता महेश राठौड़ यांची टीम लखमापुर गावात दाखल झाली. गावातील प्रत्येक घरावर मीटर लावून अखेर येथे वीज सुरु करण्यात आली. 73 वर्षांपासून आंधारात असणारं लखमापूर गाव यामुळे प्रकाशमय झालं आहे. ग्रामस्थांनी जय महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले आहेत.
काय होती लखमापूरची परिस्थिती?
चंद्रपूर विद्युतनिर्मिती केंद्रापासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लखमापूर गावात वीज पोहोचली नव्हती. चक्क मोबाईल चार्ज करण्यासाठी 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. शाळेत शिकणाऱ्या मुलांना कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत होता. मात्र आता ‘जय महाराष्ट्र’च्या प्रयत्नांमुळे गावात वीज पोहोचली आहे.