Fri. Apr 23rd, 2021

कडकनाथ घोटाळ्याचं लोण आता नाशिकमध्येही!

कडकनाथ कुक्कूटपालनात होत असलेल्या फसवणुकीचं लोण आता नाशिकमध्येही पसरलंय. सांगाली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये ‘महारयत ऍग्रो इंडिया’ या कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक झालेल्या व्यक्तीबरोबरच रकमेचा आकडा वाढत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून सरकारनं हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे

गेल्या काही दिवसांमध्ये कडकनाथ कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगलाच चर्चेचा विषय ठरत होता. मात्र अलीकडे तो फसवणुकीच्या गर्तेत अडकला असून चांगलाच चर्चेत आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात यापूर्वीच सांगली जिल्ह्यातील ‘महारयत ऍग्रो इंडिया प्रा लिमिटेड, इस्लामपूर’ या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातमी-  ‘कडकनाथ’ घोटाळा! शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

नाशिकमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रारी येऊ लागल्या आहेत.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर याठिकाणी यांनी कार्यालय सुरू केलं होतं.

प्रदर्शन भरवत अनेकांना माहितीही दिली जात होती.

यातच नाशिकच्या सय्यद पिंपरी या गावातील 63 वर्षीय शिवदास साळुंके यांनी हा व्यवसाय सुरू केला.

मात्र आपली फसवणूक झाल्याचं नंतर त्यांच्या लक्षात आलं.

13 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाली होती.

2 ते 3 दिवसांचं कोंबडीच्या पिल्लाचा 3 महिने सांभाळ करून दिल्यावर दुप्पट ते तिप्पट रक्कम मिळणार होती.

कोंबडीची सांभाळ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंपनीचे लोक कोंबड्याही घेऊन गेले.

15 दिवसांनंतर पैसे देतो, असं सांगितलं. मात्र पैसे मिळत नसल्यानं त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं.

सोनं नाणं गहाण ठेऊन, शेती तारण ठेऊन, नातेवाईकांकडून अनेकांनी पैसे घेऊन हा कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय उभा केला होता. त्याची आगाऊ रक्कमही भरली होती. मात्र पैसेही गेले आणि कोंबड्यांना खाद्य औषध नसल्यानं कोंबड्याही मारू लागल्या. त्यांना जीवदान कसं द्यायचं असा यक्ष प्रश्न उपस्थित होऊ लागला.

पोलिसांनी ही घटनेचे गंभीरपणे दखल घेत तातडीनं गुन्हा दाखल केलाय.

तपासासाठी एक पथक ही रवाना करण्यात आलंय.

आत्तापर्यंत राज्यात करोडो रुपयांची फसवणूक झाली असून 8 हजाराहून अधिक लोकांची फसवणूक झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून लावला जातोय.

हे ही वाचा-  ‘कडकनाथ’ कुणाचा? 2 राज्यांमध्ये वाद!

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसाय हा चांगला असल्याचं सांगत अनेकांना महा रयत ऍग्रो इंडिया कंपनीन गळ घालत अनेकांना गंडा घातलंय. हळूहळू यातील रकमेचा आणि तक्रारदारांचा आकडा वाढणार हे निश्चित आहे. आरोपीही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच छडा लावणं गरजेचं असलं तरी सरकारनं याबाबत हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करताय. मात्र प्रकरण पाहून पोलिसही चक्रावून गेल्यानं आता सरकारने याबाबत योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *