Tue. Oct 27th, 2020

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ देणार राजीनामा

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेस सोडल्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर काँग्रेस मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार होतं. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील सरकार कोसळलं आहे. काँग्रेस नेते आणि सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आता सरकारकडे बहुमत नाही, त्यामुळे बहुमत चाचणीत कमलनाथ सरकार टिकणार नाही, हे कबूल केलं होतं.

राज्यपालांना भेटून आपण राजीनामा देणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं. भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी यावेळी सरकार अस्थिर केल्याबद्दल भाजपावर दोषारोप केले. आपण 15 महिने मध्य प्रदेशच्या विकासाचे मनापासून प्रयत्न केले. मात्र भाजपने सरकारविरोधात कटकारस्थान रचलं.  

आपण 15 महिन्यांत शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. तरुणांसाठी युवा स्वाभिमान योजना आणून बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाला ते सहन झालं नाही. आपण माफियांविरोधात कारवाई करू नये, यासाठीच भाजपने आपल्याविरोधात कारस्थान रचून आपल्याला पायउतार होण्यास भाग पाडलं, असा आरोप यावेळी कमलनाथ यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *