Sun. Mar 7th, 2021

‘करणी’चं आव्हान, ‘मणिकर्णिके’चं प्रतिआव्हान!

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमावर आधारित कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका – द – क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. मात्र करणी सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांना करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने आक्षेप नोंदवत पत्र पाठवले आहे.

सिनेमात आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यास निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पत्राद्वारे दिला गेला. एवढंच नव्हे, तर करणी सेनेने कंगनाला थेट अॅसिड हल्ल्याचीही धमकी दिली आहे. मात्र कंगना राणावतने या धमक्यांना प्रत्युत्तर देत आपणही राजपूत असून तुम्हाला बरबाद करून टाकू असं म्हटलं आहे.

करणी सेनेचा आरोप –

राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे.

सिनेमात एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना नृत्य करताना दाखवले आहे.

सभ्यतेला धरुन नसल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे.

आपण ज्यांना राजमाता मानतो, त्यांना अशा प्रकारे नृत्य करताना दाखवणं आपल्याला मान्य नसल्याचं करणी सेनेने म्हटलंय.

कंगनाने दिले प्रतिआव्हान –

करणी सेनेच्या धमकीने कंगना राणावतने मात्र न घाबरता आपला मुद्दा स्पष्ट केलाय. ‘Manikarnika- The Queen of Jhansi’ या सिनेमाला सेन्सॉरने प्रमाणपत्र दिलं आहे. चार इतिहासकारांनी आणि सेन्सोर बोर्डने या सिनेमाला हिरवा कंदील दाखवला असताना करणी सेनेच्या विरोधाचे काय कारण, असा सवाल कंगनाने केला आहे.

“करणी सेनेने मला धमक्या देणे बंद केले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मी देखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे. मी तुमची वाट लावून टाकेन” अशी प्रतिधमकीच कंगनाने करणी सेनेला दिली आहे.

यावर करणी सेेनेने पुन्हा धमकी देत आपण जातपात पाहत नसून हिंदू धर्म आम्ही मानतो. त्याचा जर अपमान केला तर आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. एवढंच नव्हे, तर कंगना राणावतवर अॅसिड फेकण्याचीही धमकी दिली आहे.

या आधीसुद्धा करणी सेनेने ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध केला होता. त्यामुळे संजय लीला भन्सालीला त्यांच्या सिनेमाचे नाव ऐनवेळेस बदलावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *