कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीरात श्रीपूजकाला भाविकांची मारहाण
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या डोळ्यादेखतच मारहाणीची घटना घडली आहे. मंदिरातील पुजारी हटाव मोहिमेसाठी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीला उपस्थित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच महिला आंदोलकांनी अंबाबाईला घागरा-चोळी नेसवणारे पुजारी अजित ठाणेकर यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.
त्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बाहेर नेण्यात आले. अंबाबाईला घागरा चोली घातल्याबद्दल श्रीपूजकांनी प्रायश्चित घ्यावे आणि देवीसमोर दोन दिवस उपवास करावा, असा तोडगा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला. मात्र, आंदोलकांनी विरोध दर्शविताच बैठकीला उपस्थित असलेले श्रीपूजक अजित ठाणेकर आंदोलकांसमोर हसत हसत सामोरे आले.
त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी ठाणेकरांनी बाहेर जावे, अशी मागणी केली. परंतु ठाणेकर यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांनी त्यांना मारहाण सुरु केली. पाठोपाठ महिला आंदोलकांनी ठाणेकर यांचा ताबा घेत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक प्रचंड गोंधळात संपली.