कोल्हापुरात दोन कोरोनाबाधित कैदी पसार

कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये दोन कोरोनाबाधित कैदी पसार झाल्याचं समोर आलं आहे. खुनाच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल हे दोन कैदी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना कळंबा कारागृहातून आयटीआयच्या विलगीकरण कक्षात हलवण्यात आले होते.
मात्र हे दोन्ही कैदी विलगीकरण कक्षातून रात्री साडेबाराच्या सुमारास खिडकीचे गज कापून पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. कैदी पळून जाताना अन्य कैद्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तेथील सुरक्षारक्षकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र कैदी पसार झाले.