‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेसाठी ईश्वरीची भूमिका साकारण्यासाठी सुप्रिया पिळगांवकर उत्सुक

मुंबई: ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी नई कहानी’ ही मालिका लवकरच नव्या सीझनसह प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत काही बदल करण्यात आला आहे. आता या मालिकेत देव व सोनाक्षी यांच्या नात्यात ‘प्रेम आहे की दुरावा’ हे लवकरच माहित होणार आहे. शहिर शेख, एरिका फर्नांडिस आणि सुप्रिया पिळगावकर या मालिकेत देव, सोनाक्षी आणि ईश्वरी या मुख्य भूमिका पुन्हा साकारणार आहेत. ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. नव्या सीझनमध्ये पुन्हा ईश्वरी ही भूमिका साकारण्यासाठी सुप्रिया उत्सुक आहेत.
मालिकेच्या सेटवर परतल्याचा आनंद हा सुप्रिया यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं ‘ईश्वरी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची आहे. ती माझ्यासाठी खास आहे. लोकांना ही व्यक्तिरेखा आवडली आहेच; पण त्याचबरोबर पडद्यावर माझ्या आणि शहिर शेखच्या व्यक्तिरेखांमधून जे माय-लेकाचं नातं साकार झालं, ते नातं लोकांना खूप भावलं आहे. या मालिकेची खासियत म्हणजे यातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा आहे. यातल्या कथेची मांडणी प्रगल्भ आहे व मालिकेतली पात्रं सुज्ञ आहेत. या मालिकेचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे. पुन्हा एकदा या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. या टीमबरोबर चित्रीकरण करण्याचा आनंद मी मिस करत होते. पुन्हा एकदा सेटवर परतताना खूप आनंद होत आहे.’ असं सुप्रिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.