“माझ्या मुलीला जसा त्रास दिला तसाच त्रास गुन्हेगाराला द्यायला हवा”

हिंगणघाट येथील तरुणी जळीत प्रकरणातील (lecturer burnt live by married stalker) पीडित तरुणींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील 72 तास तिच्यासाठी महत्वाचे असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. असं असलं तरी कालपेक्षा या पीडित तरुणीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
या पीडित तरुणीच्या तोंडाला आणि श्वासनलिकेला गंभीर इजा झाल्याने कृत्रिमरीत्या श्वास सुरू केला आहेत. त्वचेचे पाचही थर जळाल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका आहे. परंतु या जंतू संसर्गाबाबत येत्या 1-2 दिवसात नेमकी माहिती मिळेल. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची मात्रा वाढवली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा एक गट पीडित तरुणीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
माझ्या मुलीला जसा त्रास दिला तसाच त्रास त्याला द्यायला हवा अशी मागणी पीडितेच्या उद्विग्न वडिलांनी केली आहे. फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
आपण एक सामान्य शेतकरी असल्याने रुग्णालयातील उपचाराचा खर्च आपल्याला झेपणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे तरुणीच्या उपचारासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी पीडित तरुणीच्या वडिलांनी केली आहे.