व्यापारांवरील दंड रद्द करण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र या नियमावलीमुळे व्यापारी वर्ग नाराज झाल्याचे चित्र दिसून आले आहे. दुकानात विना मास्क ग्राहक दिसल्यास दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी नाराज झाले असून दंड रद्द करण्याची मागणी व्यापारांकडून करण्यात येत आहे. दुकानदारांच्या या मागणीला पाठिंबा देत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दंड रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे व्यापारी, दुकानदारांनाही याचा मोठा फटका बसला. कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे अडचणीत असलेल्या दुकानदारांना आणखी अडचण नको त्यामुळे व्यापाऱ्यांवरील दंडाची तरतूद रद्द करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध लादणे हे अर्थव्यवस्थेला खीळ बसवणार असल्याचे ललित गांधी म्हटले आहेत. तसेच ग्राहकांच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे हे कुठल्याही पद्धतीने तर्कसंगत नसल्याचेही ते म्हणाले.
व्यापारांना लागू केलेला दंड रद्द करण्याची मागणी व्यापारी करत आहेत तसेच दंड रद्द केला नाही तर आंदोलन पुकारणार असल्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी शासनाला दिला आहे.