Wed. Mar 3rd, 2021

‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे एक वर्षाच्या मुलासाठी यकृतदान

पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया…

मुंबई – परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी’ शस्त्रक्रियेद्वारे ३२ वर्षीय व्यक्तीने यकृतदान करून आपल्या एक वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहे. पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यकृतदानाच्या पारंपारिक पद्धतीत शरीराला चीर देऊन ही शस्त्रक्रिया केली जात होती. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेत नाभीच्या खाली लहानसे छिद्र देत ही शस्त्रक्रिया केली जाते. लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट (एलडीएलटी) शस्त्रक्रियेमुळे आता अवयवांच्या प्रतिक्षा यादीवर असणाऱ्या रूग्णांचा मृत्यूदर कमी होत चालला आहे. अनेक रूग्णांना दात्याकडुन मिळालेल्या यकृतामुळे नवीन आयुष्य मिळत आहे. नयूम खान हा अवघ्या एक वर्षांचा मुलगा असून जन्मतः त्याला बिलीअरी अट्रेसिया हा यकृताचा एक दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील रूग्णालयात या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी परेल येथील ग्लोबल रूग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय चाचणीनंतर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार ३२ वर्षीय वजीर खान यांनी आपल्या यकृताचा डाव्या बाजूचा भाग मुलाला दान केल्यानंतर या मुलावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकी १० हजार नवजात बालकांपैकी एकाला हा आजार असतो. यात प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले की, ‘‘या मुलाला असणाऱ्या बिलीअरी अट्रेसिया या दुर्मिळ आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी आणले होते.

वैद्यकीय चाचणीनंतर मुलाचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचं होते. त्यानुसार वडीलांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करून हेपेटेक्टॉमी करण्याचा निर्णय घेतला. यात दुर्बिणीद्वारे यकृताचा भाग काढून घेतला जातो. टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया हा एक सुरक्षित पर्याय आहे. यात कमी वेदना, रक्तस्त्राव कमी होणे आणि गुतांगुत होण्याची शक्यता कमी होते. तरुण दात्यासाठी हा पर्य़ाय अतिशय फायदेशीर आहे.’’ ग्लोबल रूग्णालयातील कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रशांथा राव म्हणाले की, ‘‘यकृतदानाची प्रक्रिया करताना (अंदाजे १५-२० सेंटिमीटर) इतका छेद करावा लागतो. या शस्त्रक्रियेमुळे दात्याला २-३ वर्ष वेदना जाणवू शकतात. परंतु, टोटल लेप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रियेमुळे दात्याला कोणतीही वेदना होत नाही, शरीरावर चट्टे दिसत नाहीत आणि गुतांगुत निर्माण होण्याची शक्यताही खूप कमी असते.’’ लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, “सर्व मार्गदर्शक सूचना व प्रोटोकॉलचे पालन करून या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुलाची प्रकृती सुधारल्यानंतर लवकरच हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेला परत जाणार आहेत.”. ‘‘आमच्या रूग्णालयातील यकृत शस्त्रक्रियेसाठी असणाऱ्या डॉक्टरांची टीम रूग्णांना अत्यंत दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

लॅप्रोस्कोपिक डोनर हेपेटेक्टॉमी शस्त्रक्रिया ही मोजक्याच केंद्रांमध्ये केली जात आहे. आमच्या रूग्णालयात ही अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने आम्ही आनंदी आहोत. ही शस्त्रक्रिया लँप्रोस्कोपिक पध्दतीद्वारे करण्यात आली असून दात्याकडून यकृताचा काही भाग घेण्यात आला आहे. ही प्रकिया अतिशय सुलभ असल्याने यकृताच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना यकृतदान करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन देईल’’, असे ग्लोबल रूग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितले. रूग्ण वजीर खान म्हणाले की, “ग्लोबल रूग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने केलेल्या उपचाराबद्दल मी आभारी आहे. बाळ आता रडत नसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, हे पाहून आनंद होत आहे. पूर्वी बाळ नेहमी आईजवळच राहत होते. परंतु आता ते पहिल्यांदा माझ्या कुशीत झोपले. ही भावना माझ्यासाठी खूप खास आहे. यकृतदानाच्या शस्त्रक्रियेमुळे मला फार वेदना झाली नाही. आम्ही उपचारांसाठी भारतात येणाऱ्या घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *